महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कर्नाटक सरकारने देखील आगामी गणेशोत्सव संदर्भातील मार्गदर्शक सूची करीत जाहीर करावी. जेणेकरून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे सुलभ जाईल. तसेच गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यास परवानगी देण्याबरोबरच या उत्सवाशी संबंधित कारागिरांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बेळगाव मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने जिल्हा पालक मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्याकडे केली आहे.
आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी बेळगाव मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची भेट घेतली. सदर भेटीप्रसंगी गणेशोत्सवाच्या योजना संदर्भात चर्चा करण्यात आली. मागील वर्षाप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून मागील वर्षाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्याचे या बैठकीत ठरले. मागील वर्षी गणेश उत्सव तोंडावर आला असताना मार्गदर्शक सूची जाहीर करण्यात आली, त्यामुळे सर्वांना त्रास झाला. बऱ्याच प्रमाणात संभ्रम देखील निर्माण झाला होता.
ती परिस्थिती यावेळी देखील उद्भवायला नको, यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने गणेशोत्सवाची मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे. त्यानुसार कर्नाटक सरकारनेही गणेशोत्सव संदर्भातील मार्गदर्शक सूची लवकरात लवकर जाहीर करावी, जेणेकरून गणेशोत्सवाचे आयोजन सुरळीत होऊ शकेल. तसेच यंदाचा गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यास परवानगी मिळावी अशी विनंती देखील महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रिमहोदयांकडे केली.
याव्यतिरिक्त गणेशोत्सवाची संबंधित मूर्तिकार, मंडप डेकोरेटर्स, इलेक्ट्रिशियन आदी कारागिरांचे कोरोनाच्या संकटामुळे प्रचंड हाल झाले आहेत. त्यांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने यापूर्वी समाजातील जवळपास सर्व घटकांना ज्या पद्धतीने पॅकेजेस दिले आहेत. त्याप्रकारे या कारागीरांना देखील आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्याकडे केली.
याप्रसंगी बेळगाव मध्यवर्ती या गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी नगरसेवक सतीश गौरगोंडा, गणेश दड्डीकर, सागर पाटील, उदय पाटील आदी महामंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.