अतिवृष्टीमुळे बेळगाव जिल्ह्यातील 2,968 घरांची पडझड झाली असून यापैकी 146 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. त्याचप्रमाणे पूर अद्याप ओसरलेला नसून गेल्या आठवड्यापासून 192 गावांमध्ये पुराचे पाणी कायम आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे घरे जमीनदोस्त झालेल्या लोकांची निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि अद्यापही जिल्ह्यातील 21 पुलांवर पाणी कायम आहे पावसाने उसंत घेतली असली तरी पाणलोट क्षेत्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे.
त्यामुळे पूर ओसरलेला नसून 192 गावे अद्यापही पाण्यात आहेत. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे पुराची गंभीर स्थिती ओढवली असून प्रामुख्याने कृष्णा नदीकाठावर भीषण परिस्थिती उद्भवली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून अनेक ठिकाणची पूर परिस्थिती अद्यापही कायम असून घरे आणि शेती पाण्याखाली गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. घरांचे मोठे नुकसान झाले असून 146 घरे पूर्णपणे पडली आहेत, तर 2822 घरांचे भागशः नुकसान झाले आहे.
दोन्ही मिळून एकूण 2,968 घरांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे जिल्ह्यातील 37 पूल पाण्याखाली गेले होते. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यामुळे यापैकी 17 पुलावरील पाणी ओसरले असून अद्यापही 21 पूल पाण्याखाली आहेत.
दरम्यान, पूरग्रस्त भागातील लोकांना आश्रय देण्यासाठी जिल्ह्यात 141 निवारा केंद्र स्थापण्यात आली आहेत. यामध्ये गोकाक तालुक्यातील 17 मुडलगी 26, चिक्कोडी 11, निपाणी 24, रामदुर्ग 2, कागवाड 13, अथणी 17 आणि रायबाग तालुक्यातील 31 केंद्रांचा समावेश आहे. या ठिकाणी एकूण 45 हजार 908 लोकांनी आश्रय घेतला आहे. जिल्ह्यातील 192 गावांमध्ये पाणी शिरून परिसर जलमय झाला आहे.