पक्षांतर्गत भांडणे समाप्त झाली तर पुढील निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर येऊ शकतो, असे मत माजी खासदार आणि वरिष्ठ काँग्रेस नेते प्रकाश हुक्केरी यांनी व्यक्त केले आहे.
शहरातील श्री नागनुर रुद्राक्षी मठातून काल शुक्रवारी काँग्रेस नेते व माजी मंत्री एम. बी. पाटील यांच्या समवेत बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. सध्या आम्ही अनेक समस्यांनी ग्रासलेले आहोत. यात भर म्हणून कांही नेते इतर काँग्रेस नेत्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहेत. हे थांबले पाहिजे. अंतर्गत वाद -संघर्ष समाप्त झाल्यास आपोआप आम्ही सत्तेवर येऊ, असे हुक्केरी यांनी सांगितले. कोणते पक्ष सहकारी समस्या निर्माण करत आहेत? या प्रश्नाला स्पष्ट उत्तर न देता तुम्हाला ते चांगलेच माहित आहे, असे हुक्केरी पत्रकारांना म्हणाले. आम्ही अन्य कोणत्याही समस्यांनी त्रस्त नाही. जर आम्ही संघटित राहिलो तर सत्तेवर येऊ शकतो यात कोणतीच शंका नाही, असेही माजी खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले.
माजी मंत्री एम. बी. पाटील म्हणाले की, स्वतःला मुख्यमंत्री पदाचा दावेदार मांडण्याचा कांही लोकांची जो एक कल आहे, त्याला काँग्रेसने कधीच अनुमोदन दिलेले नाही. काँग्रेसमध्ये स्वयंघोषित नेता असूच शकत नाही. राज्यातील लिंगायत समाजाचा मी नेता आहे किंवा मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे असे म्हणणे चुकीचे आहे. लोकांनी तसे म्हंटले पाहिजे, असे एम. बी. पाटील यांनी स्पष्ट केले.
सध्या पक्षाला सत्तेवर आणणे यावरच आमचे सर्व लक्ष केंद्रित आहे. आगामी 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 125 ते 150 जागा जिंकायला हव्यात. त्यानंतर पक्षाच्या हायकमांडने नेतृत्व निवडीसाठी आमदारांचे अभिप्राय घ्यावेत, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसने लिंगायत नेत्यांना पुरेसे प्रतिनिधित्व न दिल्यामुळे लिंगायत समाजात असंतोष निर्माण झाला आहे असे म्हणणे चुकीचे आहे. तथापि लिंगायत नेत्यांवर उच्च जबाबदारी सोपविण्यात बाबत आम्ही वरिष्ठ काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाल यांच्यामार्फत हायकमांडकडे मागणी केली असल्याची माहिती माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली.