दूधसागर -सोनौलीम दरम्यान रुळावरून घसरलेल्या रेल्वेचे इंजिन काल सायंकाळी 5:18 वाजण्याच्या सुमारास पुन्हा रेल्वे रुळावर आणण्यात आले असून घसरलेले दोन डबे देखील आज शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पुनश्च पटरीवर आणण्यात आले आहेत.
सध्या सुमारे 100 हून अधिक मजूर आणि दोन एक्सव्हेटरच्या सहाय्याने कोसळलेला दरडीचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरडीचा दगड मातीचा ढिगारा हटवून हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पाऊस असून देखील रेल्वे कर्मचारी पूर्ण क्षमतेने दरड हटविण्याच्या कामात व्यस्त आहेत.
नैऋत्य रेल्वे मुख्यालय आणि हुबळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जातीने उपस्थित राहून कामावर लक्ष ठेवून आहेत. दरड कोसळलेली जागा अशा ठिकाणी आहे की तिथे जाण्यासाठी रस्ता नाही.
तिथे रेल्वेने जाता येते. करंजोल -दूधसागर (बोगदा क्र. 7) आणि दूधसागर -सोनौलीम या दरम्यान दोन ठिकाणी काल रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती. या घटनेमुळे दूधसागर -सोनौलीम दरम्यान रेल्वे रुळावरुन घसरली होती.