महाराष्ट्र एकीकरण समितीने आम्हाला लस उपलब्ध करून द्यावी. समितीने शिवसेनेच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली तरच आम्ही समितीप्रेमी नागरिक सरकारची ती लस घेऊ, असा निर्धार कोरे गल्लीचे पंच रणजीत हावळाणाचे यांनी व्यक्त केला.
गोवावेस राजा श्री गणेश युवक मंडळातर्फे आज बुधवारी आयोजित डेंग्यू प्रतिबंधक डोस देण्याचे शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी हावळाणाचे बोलत होते. गोवावेस येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे सदर डेंग्यू प्रतिबंधक शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे शिवसेना आरोग्य सेवा विभागाचे प्रमुख दत्ता जाधव आणि युवा नेते मदन बामणे यांच्या हस्ते श्री ची पूजा करून आरती करण्यात आली. त्याचप्रमाणे म. ए. समितीचे नेते प्रकाश मरगाळे, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, किरण परब, चंद्रकांत कोंडुसकर आणि सागर पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रकाश मरगाळे यांनी सर्व मराठी समाजाने एकत्र येऊन काम केले पाहिजे. सगळ्यांनी मराठीसाठी काम केले पाहिजे, असे विचार व्यक्त केले. दत्ता जाधव यांनी आपल्या भाषणात मला जे पद मिळाले आहे, त्याचा सदुपयोग करताना शिवसेनेच्या माध्यमातून बिगर सरकारी संघटना (एनजीओ) स्थापन करून महाराष्ट्र सरकारकडून आपल्या लोकांसाठी तसेच गोरगरिबांसाठी आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे सांगितले.
पंच रणजीत हावळानाचे यांनी आपले परखड विचार मांडताना आमच्या भागातील जे समिती प्रेमी लोक आहेत. त्यांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही असे सांगून समितीच्या सर्व घटकांनी एकत्रित येऊन शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून द्यावी, तरच आम्ही सर्व समिती प्रेमी नागरिक सरकारची कोरोना प्रतिबंधक लस घेऊ, असे ठामपणे सांगितले.
याप्रसंगी सुनील बोकडे, राजकुमार बोकडे, उमेश भातकांडे, सदानंद बिर्जे ओमकार कोचारी, नंदकुमार पाटील, जीवनसाब देसाई, राजू वर्पे, किरण गवळी, प्रवीण शिवणगेकर, रजत बोकडे, दिपक तुळसकर, मनोज बिर्जे आदींसह मंडळाचे अन्य कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते. गोवावेसचा राजा गणेश युवक मंडळातर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या डेंग्यू प्रतिबंधक डोस देण्याच्या शिबिराचा तब्बल सुमारे 700 लोकांनी लाभ घेतला.