बेळगावसाठी मंजूर झालेल्या स्टेट कंझ्युमर फोरमसाठी तात्काळ सुवर्ण विधानसौध येथे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा ग्राहक संघ आणि बेळगाव बार असोसिएशनने एका निवेदनाद्वारे कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्याकडे केली आहे.
बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पाटील आणि बेळगाव जिल्हा ग्राहक संघाचे अध्यक्ष ॲड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखालील वकिलांच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी शंकरगौडा पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले.
बेळगाव येथे स्टेट कंझ्युमर फोरम मंजूर होऊन वर्ष उलटले तरी ते सुरू करण्यास प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
बेळगाव येथे स्टेट कंझ्युमर फोरम सुरू झाला तर ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. सध्या जिल्हा फोरममध्ये खटले निकालात निघाल्यानंतर बेंगलोरला धाव घ्यावी लागत आहे. त्यासाठी वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या स्टेट कंझ्युमर फोरमसाठी तातडीने सुवर्ण विधानसौध येथे जागा उपलब्ध करून द्यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी ॲड. गजानन पाटील आणि ॲड. एन. आर. लातूर यांच्यासह बार असोसिएशनचे सचिव ॲड. आर. सी. पाटील ग्राहक संघाचे उपाध्यक्ष ॲड. जी. ए. हिरेमठ, ॲड. सी. टी. मजगी आदी उपस्थित होते.