बेळगाव उत्तर मतदार संघ आणि ग्रामीण मतदार संघाच्या सीमेवर असलेल्या कुवेंपूनगर भागातील जवळपास 5 उद्यानांची सौंदर्यीकरणासह विकासाची कामे प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये असमाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव उत्तर आणि ग्रामीण मतदार संघाच्या सीमेवरील हनुमाननगरच्या ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकास कामे राबविण्यात येत आहेत. या ठिकाणच्या उद्यानांचे सौंदर्यीकरण आणि इतर विकास कामासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुमारे 2.63 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यासाठीच्या निविदा सहा महिन्यापूर्वी काढून वर्कऑर्डर देण्यात आली असल्याचे समजते. मात्र अद्याप संबंधित कंपनीने काम सुरू न केल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कुवेंपूनगर येथील चिक्कू बाग, महाबळेश्वर पार्क, महालक्ष्मी टेंपल पार्क, पोलीस कॉलनी पार्क आणि सारथीनगर अशा पाच ठिकाणच्या उद्यानांचे सौंदर्यीकरण आणि विकास केला जाणार आहे. कुवेंपूनगर येथील संबंधित 5 उद्यानांच्या सौंदर्यीकरण आणि अन्य विकास कामासाठी 2 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उद्यानांच्या विकास कामांमध्ये हिरवळ निर्माण करणे, पेव्हर्स घालणे, कंपाउंड भिंत बांधणे वगैरे सौंदर्यीकरण्याच्या कामांचा समावेश आहे. या कामाचे कंत्राट बेळगावातील देव इंजिनिअर्स या कंपनीला देण्यात आले आहे.
गेल्या जानेवारी महिन्यात सदर विकास कामाची निविदा मंजूर करण्यात आली आहे. मात्र उद्यानांचे सौंदर्यीकरण आणि विकासाचे कामं अद्यापही सुरू झालेले नाही. याकडे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष झाले आहे. परिणामी या भागातील नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित कंत्राटदारांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.
त्याचप्रमाणे एकीकडे विकासाचा टेंभा मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी देखील याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित उद्यानांची विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत, अशीही मागणी केली जात आहे.