कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून गणली गेलेली वडगाव येथील श्री मंगाईदेवीची मंगळवार दि.3 ऑगस्ट रोजी होणारी यात्रा यंदा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. तथापि यात्रेचे सर्व धार्मिक विधी आणि कार्यक्रम साधेपणाने पार पडणार आहेत.
वडगावची ग्रामदेवता आणि लाखो लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री मंगाई देवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय पुजारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचबरोबर यात्रा काळात होणारे सर्व धार्मिक विधी व कार्यक्रम पारंपारिक साध्या पद्धतीने पार पाडण्याचा निर्णय चव्हाण पाटील पुजारी परिवाराने घेतला आहे.
दरम्यान यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलिसांनी आत्तापासूनच सतर्कता बाळगून पोलीस बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले आहे. वडगाव येथील मंगाई देवीची यात्रा शहरातील सर्वात मोठी यात्रा आहे. दरवर्षी मंगाईदेवी यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक हजर असतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी यात्रा रद्द करण्यात आली होती. आता यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यात्रा रद्द करण्याची वेळ आली. सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहायला मिळत असले तरीही, या माहामारीचा प्रभाव अद्यापही कायम आहे.
त्यामुळेच यात्रेत होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. देवस्थानच्यावतीने घेण्यात आलेल्या यावर्षीच्या यात्रा रद्द करण्याच्या निर्णयानुसार आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार शहापूर पोलिसांनी येत्या मंगळवारी होणाऱ्या श्री मंगाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.