बेळगाव शहर उपनगरातून महागड्या सायकलींची चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला टिळकवाडी पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीच्या 13 सायकली जप्त करण्यात आले आहेत.
सतीश बसाप्पा तेरणी (वय 34, रा. तेरणी हत्तरगी, ता. हुक्केरी) असे गजाआड करण्यात आलेल्या चोरट्याचे नांव आहे. गेल्या कांही दिवसांपासून शहर उपनगरातून सातत्याने महागड्या सायकलींची चोरी होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.
यातच टिळकवाडी आरपीडी क्रॉस येथील आश्रय एम्पायरमधून सायकल चोरीला गेल्याची फिर्याद उल्हास गिरीधर कुलकर्णी रा. पाटील गल्ली) यांनी गेल्या रविवारी टिळकवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास हाती घेतला.
आज मंगळवारी संशयित सतीश याला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्याने महागड्या सायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीच्या 13 सायकली जप्त केल्या आहेत.
टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पोलीस उपनिरीक्षक एम. वाय. कारीमणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त कारवाई केली