बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक अर्थात सीबीटी येथे बस नियंत्रकाशी वाद घालून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या दोघा जणांना अटक करून पोलीसांनी त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.
मारहाण झालेल्या बस नियंत्रकाचे नांव केंपान्ना हुवाप्पा हंचनाळ (वय 58) असे आहे. त्याचप्रमाणे आरोपींची नांवे जीलानी मुरतेज नरगुंद आणि आसिफ मेहबूब नरसापुर (दोघे रा. बेटगेरी जि. गदग) अशी आहेत. बेळगावात कामानिमित्त आलेले जिलानी आणि आसिफ हे दोघे काम आटपून काल रात्री पावणेदहाच्या सुमारास सीबीटीवर गेले. तेथे त्यांनी गदगला जाणाऱ्या बसची विचारणा केली. त्यावेळी नियंत्रकांनी बस किती वाजता येणार हे सांगितले. परंतु बसला इतका उशीर का? अशी विचारणा करून त्यांनी नियंत्रक केंपान्ना हुवाप्पा हंचनाळ यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हंचनाळ समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना दोघे अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी नियंत्रण कक्षात घुसून केंपान्ना हंचनाळ यांना बाहेर खेचून बेदम मारहाण केली.
सदर घटनेची माहिती मिळताच नजीकच्या मार्केट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जिलानी आणि आसिफ या दोघा तरुणांना ताब्यात घेतले. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत दोघांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करत दोघांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली. याप्रकरणी पोलिस निरिक्षक मल्लीकार्जुन तुळसीगेरी अधिक तपास करीत आहेत.