नंदीहळ्ळी (ता. बेळगाव) गावापासून श्री वाकडेवड देवीच्या देवस्थानाकडे जाणारा सुमारे अर्धा किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून हा रस्ता त्वरित दुरुस्त करून त्याचे डांबरीकरण केले जावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
नंदीहळ्ळी (ता. बेळगाव) गावापासून श्री वाकडेवड देवीच्या देवस्थानाकडे जाणारा सुमारे अर्धा किलोमीटर अंतराचा रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे.
सध्याच्या पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहनचालकांना ये -जा करणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर मोठे खाच-खळगे आणि उंचवटे निर्माण झाल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. रस्त्यावरील उंचवट्यांमुळे विशेष करून चार चाकी वाहनांच्या तळाचे नुकसान होत असल्याने भाविकांना श्री वाकडेवड देवस्थानापर्यंत जाणे कठीण झाले आहे.
सध्या पावसामुळे या रस्त्यावरील सखल भाग आणि खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी दुचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून कसरत करत वाहने हाकावी लागत आहेत.
तरी सदर रस्त्याच्या दुर्दशेकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी विशेष करून बेळगाव ग्रामीणच्या आमदारांनी गांभीर्याने लक्ष देऊन सदर रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी नंदिहळ्ळी ग्रामस्थ आणि श्री वाकडेवड देवीच्या भक्तांकडून केली जात आहे.