बेळगावच्या मराठी माणसासाठी नेहमी आवाज उठवणाऱ्या शिवसेनेत बेळगाव येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते चंद्रकांत कोंडुस्कर यांनी अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.
मंगळवारी दुपारी मुंबई शिवसेना भवन येथे राज्यसभा सदस्य, शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी शिवबंधन बांधून व हातात भगवा ध्वज देत चंद्रकांत कोंडुस्कर यांना शिवसेनेत प्रवेश दिला.यावेळी सीमाभागात शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत हे शिवसैनिक उपस्थित होते.
गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत चंद्रकांत कोंडुस्कर यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार केला होता कोंडुस्कर यांच्यासारख्या अनेकांच्या एकजुटीने लाखांहून अधिक मते पडली होती.
बेळगावात शिवसेना बळकटीच्या दृष्टिकोनातून कोंडुस्कर यांना प्रवेश देण्यात आला आहे.80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण घेऊन पुढे जाणाऱ्या शिवसेनेचे काम आणि मराठी माणसासाठी नेहमी पुढाकार घेऊ असे यावेळी चंद्रकांत कोंडुस्कर यांनी सांगितले.
कोंडुस्कर यांच्या संघटन कौशल्यामुळे मराठी माणसात नवचैतन्य निर्माण होणार अश्या भावना व्यक्त होत आहेत.कोंडुस्कर यांच्या संघटनात्मक काम मोठं असल्याने मोठ्या प्रमाणात युवा वर्ग शिवसेनेकडे वळेल असे जाणकारांचे मत आहे.