शहापूर नाथ पै सर्कल नजीकच्या भारतनगर डबल रोड परिसरातील वीज पुरवठा काल दुपारपासून खंडित झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात तक्रार केली असता हेस्काॅमचे कर्मचारी आणि कंत्राटदार एकमेकावर दुरुस्तीची जबाबदारी ढकलत असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहापूर नाथ पै सर्कल नजीकच्या भारतनगर डबल रोड परिसरातील वीज पुरवठा काल दुपारपासून खंडित झाला आहे. यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून अद्यापपर्यंत दुरूस्तीचे काम हाती घेऊन वीज पुरवठा सुरळीत न केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी शहापूर केईबी कार्यालयाकडे तक्रार केली असता तेथील कर्मचाऱ्यांकडून कंत्राटदाराकडे बोट दाखविले जात आहे.
वीजपुरवठा दुरुस्तीचे काम आम्ही कंत्राटदाराकडे सोपविले आहे. त्याच्याकडे चौकशी करा, असे सांगितले जात आहे. त्यानुसार नागरिकांनी कंत्राटदारांकडे खंडित वीज पुरवठाची तक्रार केली असता.
आपण सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगून त्याने देखील हात झटकल्यामुळे आता वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तरी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक दुरुस्तीसह भारतनगर डबल रोड येथील वीज पुरवठा सुरळीत करण्याचा आदेश द्यावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.