बेळगाव ते नवी दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षाची मागणी आता पूर्ण होणार आहे. स्पाईस जेट एअरलाईन्सने येत्या 13 ऑगस्ट 2021 पासून बेळगाव ते नवी दिल्ली थेट विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील आमदार-खासदार, मान्यवर राजकीय नेते, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षण संस्था, भारतीय हवाई दल, एमआयएलआरसी, सशस्त्र दल, एक्वस, केंद्र आणि राज्य सरकारी खाती तसेच इतर संस्था यांच्याकडून बेळगाव ते नवी दिल्ली विमान सेवा सुरू करावी अशी मागणी केली जात होती. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेली ही मागणी आता पूर्ण झाली असून स्पाइस जेट एअरलाइन्स येत्या शुक्रवार दि 13 ऑगस्ट 2021 पासून प्रारंभी सोमवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील दोन दिवस बेळगावहून थेट दिल्लीला आपली विमान सेवा सुरू करत आहे. बोईंग 737 या 149 आसनी विमानाद्वारे लेह -दिल्ली -बेळगाव -दिल्ली अशी ही विमानसेवा कार्यरत राहणार आहे. या विमानाचे सायंकाळी 4:35 वाजता बेळगाव विमानतळावर आगमन होईल आणि 5:05 वाजता ते दिल्लीला प्रयाण करेल.
यापूर्वी बेळगावहून दिल्लीला जाणारे लोक व्हाया मुंबई, व्हाया बेंगलोर किंवा व्हाया हैदराबाद प्रवास करत होते. आता थेट दिल्ली विमानसेवा सुरू झाल्यामुळे त्यांना बेळगावहून अडीच तासात नवी दिल्ली गाठता येणार आहे. बेळगाव विमानतळावरून सायंकाळी 5:05 वाजता प्रयाण करणारे स्पाइस जेटचे विमान सायंकाळी 7:30 वाजता दिल्लीला पोहोचणार आहे.
खास करून बेळगावातील संरक्षण दलाच्या अधिकारी, कर्मचारी आणि जवानांचे दिल्लीला कायम येणे-जाणे असते. त्यामुळे एमएलआयआरसी, सीआरपीएफ, भारतीय हवाई दल आदींसाठी ही विमानसेवा उपयुक्त ठरणार आहे असे सांगून सदर विमानं सेवेची मागणी करणाऱ्या सर्वांचे बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी आभार मानले आहेत. लेहशी हे विमान कनेक्ट असल्यामुळे संरक्षण दलातील जवानांना याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे या विमान सेवेमुळे नवी दिल्ली येथे कामाला असलेली बेळगावची मंडळी किंवा बेळगावात असलेली नवी दिल्ली येथील मंडळी आठवड्यात साप्ताहिक सुट्टी काढून आपल्या घरी ये-जा करू शकणार आहेत, असेही मौर्य यांनी स्पष्ट केले.
सध्या बेळगाव विमानतळ देशातील 12 प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे. बेळगाव विमानतळावरून मेसर्स अलाइन्स एअर, स्पाइस जेट, स्टार एअर, इंडिगो आणि ट्रू जेट या विमान कंपन्यांद्वारे बेंगलोर म्हैसूर, कडप्पा, तिरूपती, मुंबई, पुणे, अहमदाबाद, नाशिक, हैदराबाद, इंदोर, सुरत आणि जोधपूर या शहरांना विमानसेवा सुरू आहे.