बेळगाव महानगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी तब्बल 44 कोटी रुपयांची कृती योजना आखली आहे. तथापि ती अद्याप जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ तसेच नागरी संस्थेच्या प्रशासकांकडे सादर करावयाची आहे.
आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या एकूण 9 कंत्राटदारांवर कचऱ्याची उचल करून शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या कंत्राटाच्या कराराची मुदत संपलेली असली तरी नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया अद्याप सुरू व्हावयाची असल्याने त्यांचे काम सुरूच आहे. बेळगाव महापालिकेने देखील संबंधित कंत्राटदारांच्या कंत्राटाची मुदत वाढवून दिली आहे. एकदा का निविदा प्रक्रिया पूर्ण झाली की महापालिकेकडून सध्याच्या 132 नियमित कामगार आणि 555 कराराने कामावर घेतलेले कामगार यांच्यासह अतिरिक्त आणखी 300 स्वच्छता कामगारांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे.
गेल्या दोन वर्षात बेळगाव महापालिकेने शहर स्वच्छतेची कृती योजना तयार करून योजनेचा प्रस्ताव अनेक वेळा मंजुरीसाठी पाठवली होती. परंतु प्रत्येक वेळी तांत्रिक दोषामुळे सदर प्रस्ताव नाकारण्यात आला होता. प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलान बिश्वास हे महापालिकेचे प्रशासक असताना त्यांनी पहिल्यांदा या प्रस्तावाला आक्षेप घेतला होता. तसेच तो 12 ऐवजी दोन पॅकेजीस इतका कमी केला जावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर सुधारित प्रस्ताव शहर विकास खात्याकडे धाडण्यात आला होता. मात्र तो पुन्हा विविध तांत्रिक कारणास्तव नाकारण्यात आला.
आता सर्व तांत्रिक दोष निकालात काढण्याबरोबरच स्वच्छतेचे काम चार पॅकेजीसमध्ये विभागण्यात आले आहे. शहरातील एकूण 47 प्रभागांच्या स्वच्छतेचे काम चार पॅकेजेसमध्ये विभागण्यात आले आहे. यामुळे कंत्राटदार कमी लागणार असून कामाचा दर्जा देखील सुधारणार आहे. शहरातील उर्वरित 11 प्रभागांच्या स्वच्छतेची काळजी महापालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत असणारे पौरकार्मीक घेणार आहेत.
बेळगाव शहर स्वच्छतेसाठी अंदाजे 44 कोटी रुपये खर्चाची कृती योजना तयार करण्यात आली असून मंजुरीसाठी ती प्रशासकांकडे धाडण्यात आली आहे. इतर महापालिकांनी शहर स्वच्छता कृती योजनेच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. आमचाच प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. हा प्रस्ताव येत्या दोन महिन्यात मंजूर होईल अशी आमची अपेक्षा आहे, असे बेळगाव महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी स्पष्ट केले आहे.