बेळगाव शहरासह तालुक्यात गेल्या बुधवारी रात्रीपासून दमदार पावसाला प्रारंभ झाल्यामुळे शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला असून अनेक ठिकाणी पुल, रस्ते आणि शेत पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले असून कांही ठिकाणी घरे व झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे मालमत्तेसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
बेळगाव शहरासह तालुक्यात बुधवारी सायंकाळनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. दमदार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जोरदार पावसामुळे गटारी व नाले तुडुंब भरून वहात आहेत. टिळकवाडीतील मराठा कॉलनीसह येळ्ळूर रोडवरील अन्नपूर्णेश्वरनगर, शिवाजीनगर पंजीबाबा दर्गा आदी परिसर जलमय झाला असून या ठिकाणच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या ठिकाणच्या घरांमध्ये गुडघ्यावर पाणी शिरले आहे. अलीकडे कांही वर्षापूर्वी शेतवाडीत वसलेल्या वसाहतींपैकी उज्वलनगर आणि तिरंगा कॉलनी या भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून या ठिकाणच्या रस्त्याशेजारून एखाद्या नाल्या प्रमाणे पावसाचे पाणी तुडुंब भरून वाहत आहे.
शहरातील वीरभद्रनगर, महाद्वार रोड, शिवाजीनगर, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर आदी परिसर जलमय झाला आहे. शास्त्रीनगर येथे घराघरांमध्ये पाणी शिरले आहे. कपिलेश्वर कॉलनी व शास्त्रीनगर येथे सुमारे 3 फूट पाणी साचले आहे. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याबरोबरच रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. या पावसामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत केलेल्या कामाचा निकृष्ट दर्जा उघड झाला आहे. कांही ठिकाणी घातलेले कॉंक्रिट पावसामुळे वाहून गेले आहे. अर्धवट अवस्थेतील विकासकामांच्या ठिकाणी चिखलाची दलदल निर्माण झाली आहे.
धुवाधार पावसामुळे शहर व तालुक्यात घरे व झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाजीनगर पाचवी गल्ली येथील रामचंद्र चौगुले यांच्या दुमजली घराची एका बाजूची भिंत काल रात्री पावसामुळे अचानक कोसळली. या दुर्घटनेत गीता रामचंद्र चौगुले या जखमी झाल्या असून चौगुले यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शहापूर कचरी गल्ली येथे घराची भिंत कोसळली तर कंग्राळ गल्ली येथे एक घर कोसळले आहे. त्याप्रमाणे खडेबाजार परिसरातही घर कोसळून मोठे नुकसान झाले. मात्र या दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. शहर व तालुक्यात पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर आला असून नाल्याच्या परिसरातील सर्व शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. नाल्यातील पाण्यामुळे येळ्ळूर आणि अनगोळ शिवार जलमय झाले आहे. या भागातील जुने बेळगाव ते धामणे रोड संपूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. भात पिके आणि लावणी केलेली भात पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा आर्थिक फटका बसला आहे.
सलग दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश गावांचे संपर्क रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गुरुवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे आंबेवाडी -मन्नूर पूल पाण्याखाली गेल्यामुळे मन्नूर, गोजगे आदी गावांचा संपर्क तुटला आहे. आंबेवाडी -अलतगा संपर्क रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. जुने बेळगाव ते धामणे रोड या रस्त्याची देखील हीच अवस्था झाली आहे. हा रस्ता देखील पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. मार्कंडेय नदीच्या पाण्यामुळे मन्नूर रोड जलमय झाला आहे. संततधार पावसामुळे शहराप्रमाणे ग्रामीण भागातील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे
मार्कंडेय नदी दुथडी भरून वहात असल्यामुळे कंग्राळी नजीकचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. नदीकाठावरील जमिनीमध्ये पुन्हा पाणी शिरून पिके पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यातील नाले तुडुंब भरून पाणी रस्त्याभरून वाहत असल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. वाघवडे येथे नाल्यात वाहून जाणाऱ्या एका इसमाला ग्रामस्थांनी वाचविले.
नाल्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहात पुलापासून कांही अंतरावर नाल्यांमध्ये अडकून पडलेल्या या इसमाला दोरीच्या सहाय्याने खेचून बाहेर काढण्यात आले. एकंदर बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या मालमत्तेचेसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी या पावसाने साऱ्यांच्याच मनामध्ये धडकी निर्माण केली असून पाऊस कमी होणार की नाही? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.