बेळगाव पशु कल्याण संघटनेने (बावा) बेळगावातील पहिली ॲनिमल अँब्युलन्स अर्थात पशू रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ॲनिमल अँब्युलन्ससाठी निधी गोळा केला जात असून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांसाठी आपण हवे ते करत असतो. परंतु ते आजारी पडले, त्यांना कांही झाले तर अशा गोष्टी हाताळणे सोपे नसते. कारण पाळीव प्राण्यांसाठी 108 अँब्युलन्स उपयोगाची नसते. तथापि मनुष्याप्रमाणे प्राण्यांना देखील आपत्कालीन वैद्यकीय सेवा अथवा तातडीचे उपचार मिळण्यासाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्थेची गरज असते, हे ध्यानात घेऊन बेळगाव पशु कल्याण संघटनेने (बावा) बेळगावातील ही पहिली ॲनिमल अँब्युलन्स अर्थात पशू रुग्णवाहिका सुरू केली जाणार आहे.
बावा संघटनेचे कार्य शहरवासीयांना सुपरिचित आहे. या संघटनेतर्फे संकटात सापडलेल्या मुक्या प्राण्यांना जीवदान देण्याचे कार्य सातत्याने सुरू असते. आता आपले हे पशु कल्याणाचे कार्य आणखी विस्तृत करताना या संघटनेतर्फे प्राण्यांसाठी अँब्युलन्स सुरू केली जाणार आहे. आजारी अथवा अपघातग्रस्त प्राण्यांना तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज असणे, प्राण्यांना ऑक्सीजन अथवा मुलत: द्रव्यांची गरज असणे, जखमी झाल्याने चालता येत नसलेल्या प्राण्यांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्याची सोय नसणे अशा विविध कारणास्तव ही अँब्युलन्स सेवा उपयोगी ठरू शकणार आहे.
सदर अँब्युलन्समध्ये प्रथमोपचाराची औषधे आणि साधनांसह आजारी अथवा जखमी प्राण्यांच्या तपासणीसाठी लागणारी उपकरणे, ऑक्सिजनची टाकी, प्राण्यांसाठीचे ऑक्सिजन मास्क, प्राण्यांचे स्ट्रेचर आदी आवश्यक सर्व गोष्टी उपलब्ध असणार आहेत.
आपल्या ॲनिमल अँब्युलन्सच्या माध्यमातून बावा या स्वयंसेवी संघटनेने शहर परिसरातील पाळीव तसेच भटक्या प्राण्यांसाठी वर्षाचे 345 दिवस 24 तास सेवा देण्याचा संकल्प सोडला आहे. सदर ॲनिमल अँब्युलन्ससाठी आणि तिच्यामध्ये बसविण्यात येणाऱ्या सामग्रीसाठी निधी जमविण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात मदत करू इच्छिणाऱ्यांनी अथवा अधिक माहिती तसेच शंका -सूचनांसाठी [email protected] या ई-मेल अड्रेसवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.