कोरोना प्रादुर्भावाचे संकट लक्षात घेऊन बकरी ईद सणासाठी आरोग्य विभागाने नियमावली घोषित केली केली आहे. त्यानुसार वयोवृद्ध व्यक्ती व मुलांना त्यादिवशी घरीच नमाज पठण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मशिदीमध्ये फक्त 50 जणांनाच सामूहिक नमाज पठणासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
बकरी ईद येत्या बुधवार दि. 21 जुलै रोजी असून या दिवशी मुस्लिम बांधवांचे सामूहिक नमाज पठण असते. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने आरोग्य विभागाने नियमावली घोषित केली असून काही निर्बंध लागू केले आहेत. सामान्यपणे ईदगाह मैदानावर सामुहीक नमाज करण्याची परंपरा आहे.
सध्या अनलॉक जारी असला तरी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन यासंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बजावण्यात आलेल्या सुधारित आदेशानुसार 50 पेक्षा अधिक लोकांना मशिदीमध्ये जमता येणार नसल्याचे म्हंटले आहे.
याशिवाय प्रार्थना स्थळी प्रत्येकाने मास्क परिधान करणे. 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती आणि 10 वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या मुलांनी घरीच नमाज पठण करावे. नमाज पठण करताना दोन व्यक्ती दरम्यान 6 फूट सामाजीक अंतर असावे. मशिदीत प्रवेश करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जावी. हात साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर केला जावा. हात मिळविणे किंवा गळाभेट टाळावी.
रस्त्याच्या बाजूला, हॉस्पिटल, नर्सिंग होम, शाळा, महाविद्यालय परिसर, शाळा मैदान आणि धार्मिक स्थळांसह उद्यान तसेच सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांचा बळी देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. बकरी ईद सणानिमित्त सर्व पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली आहे.
त्या बैठकीतही संबंधित पोलिस ठाण्यात एसीपी, पोलीस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांनी बकरी ईद सणानिमित्त शासनाकडून घोषित नियम, निर्बंध आदी विषयांची माहिती शांतता समिती पदाधिकाऱ्यांना दिली आहे.