Thursday, January 23, 2025

/

आता विमानतळापर्यंत शटल बस सेवेची आहे गरज

 belgaum

बेळगाव ते नवी दिल्ली विमानसेवेची गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी मान्य होण्याबरोबरच आता बेळगाव विमानतळावर पहिल्यांदाच बोईंग -737 विमान हाताळले जाणार आहे. शिवाय बेळगाव विमानतळ देशातील 12 प्रमुख शहरांशी जोडले गेले असल्यामुळे आता भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि एनडब्ल्यूकेआरटीसी यांनी बेळगाव शहरापासून विमानतळापर्यंत शटल बस सेवा सुरू करण्याचा पुनर्विचार करण्यास हरकत नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सध्या बेळगाव विमानतळ देशातील 12 प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे. बेळगाव विमानतळावरून मेसर्स अलाइन्स एअर, स्पाइस जेट, स्टार एअर, इंडिगो आणि ट्रू जेट या विमान कंपन्यांद्वारे बेंगलोर म्हैसूर, कडप्पा, तिरूपती, मुंबई, पुणे, अहमदाबाद, नाशिक, हैदराबाद, इंदोर, सुरत आणि जोधपूर या शहरांना विमानसेवा सुरू आहे. यात भर म्हणून आता येत्या 13 ऑगस्ट पासून स्पाइस जेट एअरलाइन्सची बेळगाव ते नवी दिल्ली अशी बोईंग -737 विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे आता एएआय आणि एनडब्ल्यूकेआरटीसी यांनी बेळगाव शहरातून विमानतळापर्यंत शटल बस सेवा सुरु करण्याचा पुनर्विचार करण्यास हरकत नसल्याचे मत जाणकारांमध्ये व्यक्त होत आहे.

गेल्या 2017 साली एनडब्ल्यूकेआरटीसीने या पद्धतीची बस सेवा सुरू केली होती. तथापि बेळगाव विमानतळावरील कमी झालेली विमान उड्डाणे आणि प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे कालांतराने ही बससेवा बंद झाली. त्यानंतर 2019 मध्ये त्याच प्रकारची बससेवा सुरू झाली पण तीदेखील अर्ध्यावर बंद पडली. तेंव्हा या बस सेवेसाठी व्हॉल्वो बी 7आर लो -फ्लोअर बस किंवा व्हॉल्वो ऐरावत बस वापरात होती. उद्यमबाग ते कित्तूर चन्नम्मा सर्कल, सीबीटी मार्गे बेळगाव विमानतळ असा तिचा मार्ग होता. या बसच्या दररोज पाच फेऱ्या होत होत्या. यापैकी तीन फेऱ्या सीबीटी येथून सुरू होऊन तेथेच समाप्त होत होत्या. चौथी उद्यमबाग येथे आणि पाचवी रेल्वेस्टेशन येथे समाप्त व्हायची. त्याकाळी या बस सेवेचे जास्तीत जास्त भाडे 100 रु. इतके होते.Shuttle Bus airport

आता बेळगाव ते नवी दिल्ली बोईंग विमान सेवा सुरू होत आहे. तेव्हा एएआय आणि एनडब्ल्यूकेआरटीसी यांनी पुन्हा शटल बस सेवा सुरू करण्याचा विचार करण्यास हरकत नाही. त्यामुळे विमान प्रवाशांची संख्या वाढेल. कारण शहरातून बेळगाव विमानतळावर पोहोचणे ही प्रवाशांसाठी मोठी समस्या असते. यासाठी त्यांना खासगी टॅक्सी सारख्या वाहनांखेरीज दुसरा पर्याय नसतो. शटल बस सेवा सुरू झाल्यास प्रवाशांसाठी ती अनुकूल ठरणार आहे.

स्पर्धा वाढविण्यासाठी आणि वाहतूक खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रेंट -अ -कार काउंटर सुरू केला आहे. या पद्धतीची संकल्पना बेळगाव विमानतळावर राबविण्यास काहीच हरकत नाही. बेळगाव विमानतळाने अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. हवाई प्रवाशांना विमानतळाबाहेर पडल्यानंतर वाहतुकीसाठी बहुपर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठीच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रयत्नांचा हा एक भागच असणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.