दक्षिण काशी म्हणून सुपरिचित असलेल्या शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे कोरोना प्रादुर्भाव काळातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल आज छ. शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून युवा सेना बेळगाव या संघटनेचा गौरव करण्यात आला.
युवा सेना बेळगाव ही संघटना गेल्या दोन -अडीच महिन्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाउनच्या काळात मोफत अन्न वाटपाचा उपक्रम यशस्वीरित्या राबवत आहे.
या उपक्रमांतर्गत सिव्हील हॉस्पिटलसह विविध हॉस्पिटलमधील कोरोनाग्रस्त रुग्ण, त्यांचे नातलग आणि रस्त्यावरील गोरगरीब गरजुंना पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसह जेवणाच्या पाकिटांचे मोफत वाटप केले जात आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना या उपक्रमाचा लाभ मिळाला असून त्यांनी युवा सेना बेळगावला धन्यवाद दिले आहेत.
या कार्याची दखल घेऊन श्री कपलेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे सुनील बाळेकुंद्री यांच्या हस्ते युवासेना बेळगावचे विनायक हुलजी यांचा आज गुरुवारी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
छ. शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. समर्थनगर येथील एका छोट्या हॉलमधून देणगी स्वरूपात मिळालेले साहित्य आणि कांही मित्रांनी स्वतःच्या खिशातील पैसे घालून किरकोळ स्वरूपात सुरू केलेला युवा सेना बेळगावचा मोफत अन्न वाटपाचा उपक्रम आज शहरात मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे हे विशेष होय.