Friday, December 20, 2024

/

जागतिक रक्तदान दिनानिमित्त शहरातील रक्तदात्यांचा सत्कार

 belgaum

जागतिक रक्तदान दिनानिमित्त भारतीय रेड क्रॉस सोसायटीतर्फे आज सोमवारी सकाळी शहरातील आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.

सिव्हिल अर्थात बीम्स हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या हॉलमध्ये सदर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, बीम्सचे संचालक डॉ. कुलकर्णी सीईओ श्रीमती बल्लारी अफरीन, डाॅ. रवींद्र पाटील, भारतीय रेड क्रॉस सोसायटी बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष अशोक बदामी, सेक्रेटरी डी. एन. मिसाळे आणि जिल्हा सर्जन डॉ. सुधाकर उपस्थित होते.

प्रारंभी डी. एन. मिसाळे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवलिंगप्पा कित्तूर, संजय पाटील, डाॅ. पवन शर्मा, एस. व्ही. विरगी, सुरेंद्र अनगोळकर आणि संतोष दरेकर या सर्वाधिक वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आत्तापर्यंत सत्कारमूर्तींपैकी शिवलिंगप्पा कित्तूर यांनी 116 वेळा, महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय पाटील यांनी 112 वेळा, डॉ. पवन शर्मा यांनी 90 वेळा, एस. व्ही. विरगी यांनी 64 वेळा, हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी 54 वेळा आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी 24 वेळा रक्तदान केले आहे. याबद्दल प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी या सर्वांतबद्दल प्रशंसोद्गार काढून रक्तदानाचे महत्त्व थोडक्यात विशद केले. सुदृढ व्यक्तींनी रक्तदानास पुढे आले पाहिजे असे सांगून त्यांनी सुरेंद्र अनगोळकर यांच्या ऑटो ॲम्बुलन्स उपक्रमाचे विशेष कौतुक केले.World blood donation day

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी देखील सत्कार मूर्तींच्या रक्तदान कार्याची स्तुती करून रक्तदानाचे महत्त्व सांगितले. व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी देखील यावेळी समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमास भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या बेळगाव जिल्हा शाखेचे पदाधिकारी आणि सदस्यांसह बीम्समधील वैद्यकीय अधिकारी, सरकारी अधिकारी, निमंत्रित आणि हितचिंतक उपस्थित होते. डी. एन. मिसाळे यांनी सर्वांचे आभार मानले.

सदर सत्कार समारंभानंतर जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड क्रॉस सोसायटीतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्याद्वारे शुभारंभ करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.