दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहर उपनगरासह ग्रामीण भागात सुहासिनी महिलांनी आज वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने साजरी केली. तथापि कोरोनाचे सावट असल्यामुळे वडाची पूजा करण्यासाठी नेहमीपेक्षा यंदा महिलांची संख्या कमी दिसून आली.
अखंड सौभाग्य लाभू दे या प्रार्थनेसह कोरोना संसर्गाचे संकट कायमचे टळू दे अशी प्रार्थना करत शहर उपनगरासह ग्रामीण भागातील महिलांनी आज गुरुवारी सकाळी वटपौर्णिमा साजरी केली. दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी शहरातील विविध ठिकाणच्या वडाच्या झाडाच्या ठिकाणी पूजेसाठी महिलांची एकच झुंबड उडाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मात्र यंदा कोरोनाच्या भितीमुळे कांही तुरळक ठिकाणीच महिलांची पूजेसाठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.
समादेवी गल्ली येथील वडाचा पार, कॅम्प परिसरातील वडाची झाडे, व्हॅक्सीन डेपो येथील वटवृक्ष, संगोळी रायान्ना चौकातील वडाचे झाड, क्लब रोडवरील वटवृक्ष,कॅम्प अनगोळ वडगांव आदी सर्व ठिकाणी आज सकाळी पूजेसाठी महिलांची लगबग दिसून आली.
संसर्गापासून दूर राहण्यासाठी बहुतांश महिलांनी वडाची फांदी घरी घेऊन जाऊन त्याची परंपरेनुसार पूजा करण्याद्वारे वटपौर्णिमा साजरी केली. त्याच प्रमाणे कांही महिलांनी वडाच्या झाडांची रोपे खरेदी करून त्यांची पूजा केली. त्यामुळे वटपौर्णिमेनिमित्त परस्परांना भेटण्याच्या आनंदापासून महिलांना कांही प्रमाणात वंचित राहावे लागले.
दरम्यान, वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहर उपनगरातील बाजारपेठेत दरवर्षीप्रमाणे वट पूजेचे साहित्य उपलब्ध झाले होते. यामध्ये सौभाग्य वाचन -आरसा, फणी, हळदीकुंकू करंडे, मनी मंगळसूत्र, सुताचा धागा, पाच प्रकारची फळे आदींचा समावेश होता.
यंदा दोन दिवस आधीपासूनच या साहित्याची खरेदी झाली. न जाणो पुन्हा लाॅक डाऊन झाले तर… असा विचार करून सुहासिनी महिलांनी आधीच वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी केले होते.