Saturday, January 11, 2025

/

वीकेंड लॉक डाऊन समाप्त होताच पुन्हा तोबा गर्दी!

 belgaum

वारंवार आवाहन करून देखील दोन दिवसांच्या वीकेंड लॉक डाऊन समाप्त झाल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांनी आज सोमवारी सकाळी बाजारपेठेत पुन्हा एकच गर्दी केली होती. परिणामी सामाजिक अंतराचे भान न राहता गर्दी करणाऱ्यांना कांही ठिकाणी पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी आणि शनिवार व रविवार सलग दोन दिवस संपूर्ण कडक लॉकडाउन जारी केला होता. आज सोमवारी सकाळी 6 वाजता या लॉक डाऊनची मुदत संपताच ठिकठिकाणच्या बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. रविवार पेठ गणपत गल्ली, कंबळी खुट, खडेबाजार आदी ठिकाणी सामाजिक अंतराचे भान न राखता लोकांनी तोबा गर्दी केली होती. जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकी रिक्षा कारगाडीसह अन्य वाहनातून लोक खरेदीला आले होते.

जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात आलेली असताना आज 10 वाजल्यानंतर देखील बाजारात गर्दी दिसून आली. परिणामी कांही ठिकाणी पोलिसांना अनाठायी गर्दी करणाऱ्या नागरिकांना लाठीचा प्रसाद द्यावा लागला. यावेळी मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी कारमधून आलेल्या कांही व्हाईट कॉलर नागरिकांना कोरोना मार्गदर्शक सूचीची जाणीव करून देऊन चांगलेच फैलावर घेतले.

दरम्यान, प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील विकेंड लॉक डाऊन समाप्त होताच बाजारपेठेत गर्दी उसळण्याचा कोरोना संसर्गाला खतपाणी घालणारा हा प्रकार सातत्याने घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सुदैवाने सध्या बेळगावात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत आहे. तेंव्हा शहरवासीयांनी थोडा संयम बाळगायला हवा. कोरोना अद्याप हद्दपार झालेला नाही, याची जाणीव ठेवून नागरिकांनी कोठेही गर्दी करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.