गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत 3 फुटांनी वाढ झाली असून हिडकल जलाशयातील पाणी पातळी दोन दिवसात 2 टीएमसीने वाढली आहे.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिडकल जलाशयात 17 हजार 144 क्युसेक्स इनफ्लो झाल्यामुळे जलाशयातील पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. गेल्या मंगळवारी रात्री दोन्ही जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे दोन्ही जलाशयातील इनफ्लो वाढला आहे.
गेल्या मंगळवारी राकसकोप जलाशयाची पाणी पातळी 2454.5 फूट इतकी होती. ती दोन दिवसात पावसामुळे तीन फुटाने वाढली आहे. गेल्या वर्षी 2020 मध्ये 17 जून रोजी या जलाशयाची पातळी 2454.80 फूट इतकी होती.
यंदा ती 2457.80 फुट झाली आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणी पातळी तीन फुटांनी जास्त आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्या पावसाच्या वेळी राकसकोप झाल्याची पातळी 3 फूटाने कधी वाढली नव्हती असे पाणीपुरवठा मंडळाचे म्हणणे आहे.
दरम्यान, हिडकल जलाशयात 15 जून रोजी एकूण पाणीसाठा 5.046 टीएमसी होता. त्यात जिवंत पाणीसाठा 3.026 होता. गेल्या दोन दिवसात पावसामुळे एकूण पाणीसाठा 7.162 टीएमसी तर जिवंत पाणीसाठा 5.142 टीएमसी झाला आहे. जूनच्या प्रारंभी हिडकलमधून शेतीसाठी पाणी सोडल्याने जलाशयातील पाण्याची पातळी खूपच खालावली होती. त्यामुळे 15 जून रोजी गतवर्षीच्या तुलनेत दोन टीएमसी कमी पाणीसाठा होता.
मात्र आता जोरदार पावसामुळे हिडकल जलाशयातील पाणीसाठा वाढला आहे. आंबोली जवळ उगम पावणाऱ्या घटप्रभा व ताम्रपर्णी या दोन नद्यांचे पाणी हिडकल जलाशयात येते. आंबोलीसह चंदगड तालुक्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्यामुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळेच हिडकल जलाशयातील इनफ्लो 17 हजार क्युसेक्स पेक्षा जास्त झाला आहे.