प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणाऱ्यांच्या यादीमध्ये आता वृत्तपत्र विक्रेत्यांसह आणखी आठ वर्गांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून बजावण्यात आलेल्या आदेशानुसार संसर्गाची अधिक शक्यता असणाऱ्या घटकांना प्राधान्याने लस देण्यात येणार असून त्यात वृत्तपत्र विक्रेते, तृतीयपंथीय, वारांगना, साधु -साध्वी आदींचा समावेश आहे.
राज्यातील कोरोनाचा संसर्ग थोपविण्यासाठी लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ज्याना कोरोनाची बाधा होण्याची अधिक शक्यता आहे, त्यांना प्रथम लस देण्याबाबत नियोजन केले जात आहे.
आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, शासकीय कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना लसी दिल्या जात आहेत. त्यासोबत 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण घोषित करण्यात आले आहे. मात्र लसीचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे प्रत्येकाला लस मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठी 18 ते 44 या वयोगटात प्राधान्य ठरवून लसीचे नियोजन केले जात आहे.
दिव्यांगांच्या लसीकरणाला गेल्या सोमवारी चालना देण्यात आली असून आता न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (एनपीसीआयएल) कर्मचारी, नेव्हल बेस सिव्हिलियन्स, तृतीयपंथीय, वारांगना, साधु -साध्वी, वृत्तपत्रांचे एजंट, विक्रेते, सलून व्यवसायिक, ब्युटीपार्लर चालक आणि तेथील कर्मचारी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, खाजगी वैद्यकीय प्रतिनिधी आदींना प्राधान्याने लस देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.