कोरोना प्रादुर्भावाचा संभाव्य तिसऱ्या लाटेच्या बाबतीत बेळगाव जिल्हा प्रशासन अधिकच जागरूक झाले आहे. ही लाट थोपविण्यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून खास करून महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील चेक पोस्टच्या ठिकाणी नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.
बेळगाव जिल्ह्याला महाराष्ट्राशी जोडणार्या रस्त्यांपैकी निपाणी रस्त्यावरील कोगनोळी चेकपोस्ट तसेच कागवाड, अथणी आणि शिनोळी येथील चेकपोस्ट, याबरोबरच गोवा राज्याशी जोडल्या गेलेल्या संपर्क रस्त्यांच्या ठिकाणी आरोग्य खात्याचे डॉक्टर व कर्मचारी, आशा कार्यकर्ते आणि पोलीस कोरोना संदर्भात सतर्कतेने आपले कर्तव्य बजावत आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटक हद्दीत प्रवेश करणारे प्रत्येक वाहन अडवून त्यातील प्रत्येक प्रवाशाचा कोरोना तपासणी अहवाल तसेच लसीकरण झाल्याचा अहवाल तपासला जात आहे. हे दोन्ही अहवाल ज्यांच्याकडे आहेत अशांनाच कर्नाटक हद्दीत प्रवेश दिला जात आहे. ज्यांच्याकडे हे अहवाल नसतील त्यांना माघारी धाडले जात आहे.
बेळगाव नजीकच्या महाराष्ट्र सीमेवरील शिनोळी चेक पोस्ट येथे आरोग्य खात्याचे दोन कर्मचारी, आशा कार्यकर्ते आणि केवळ दोनच पोलिसांना महाराष्ट्रातून येणारी वाहने अडवून कोरोना अहवाल व लसीकरण अहवाल तपासण्याचे काम करावे लागत आहे. परिणामी तपासणीचे काम मंद गतीने होत असल्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचे रूपांतर घातक डेटा प्लस व्हेरीएंट मध्ये झाले आहे, यासाठीच महाराष्ट्रातून सीमाभागात येणाऱ्या प्रत्येकाच्या कोरोना संदर्भातील तपासणी अहवालासह लसीकरणाच्या अहवालाची तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक चेक पोस्टच्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून काटेकोर तपासणी केली जात आहे. ज्या प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्ह अहवालासह लसीकरणाचा अहवाल असेल त्यांनाच जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.