सध्या सुरू असलेल्या पावसासह जोरदार वाऱ्यामुळे रस्त्याशेजारील मोठा वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्यामुळे संबंधित रस्ता कांही काळ बंद झाल्याची घटना लक्ष्मीटेक रोडवर आज दुपारी घडली.
परवा रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लक्ष्मीटेक रोड या रस्त्याशेजारील अकेशियाचे एक मोठे झाड आज दुपारी 2:30 च्या सुमारास उन्मळून रस्त्यावर मधोमध पडले. सध्याच्या लाॅक डाऊन आणि पावसाळी वातावरणात क्वचित तुरळक वाहतूक सुरु असल्यामुळे झाड कोसळले त्यावेळी सुदैवाने रस्त्यावर कोणीही नव्हते.
तथापि कोसळलेल्या झाडामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता. सदर घटनेची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्व यांना दिली. त्यांनी लगेच आपल्या सार्वजनिक बांधकाम खात्यास घटनेची माहिती दिली. त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व समाज सेवक साजिद शेख यांना फोन करून सहकार्य करण्याची विनंती केली.
बर्चस्व यांचा फोन येताच साजिद शेख आपल्याकडील झाडाच्या फांद्या कापण्याच्या ‘चेन -सॉ’ मशीनसह त्वरेने घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी स्वतःहून मशीनच्या सहाय्याने रस्त्यावर कोसळलेले संबंधित झाड तोडले. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी झाडाचा बुंधा, फांद्या रस्त्यावरून हटवून लक्ष्मीटेक रोड वाहतुकीसाठी खुला केला. याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे पर्यवेक्षक संदीप अष्टेकर, बाबू, इम्तियाज शेख आदींसह लष्करी अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पर्यावरण प्रेमी असणाऱ्या साजिद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार अकेशियाची झाडे उंच वाढतात. त्यामुळे ती लावताना जमिनी किमान तीन साडेतीन फूट खोल खड्डा खणला गेला पाहिजे. तथापि कॅंटोन्मेंट परिसरात अनेक ठिकाणी ही झाडे जमिनीत खोल खड्डा न काढता वरच्यावर लावण्यात आल्यामुळे उंच वाढल्यानंतर सदर झाडे उन्मळून पडत आहेत. तेंव्हा अकेशिया सारखी झाडे लावताना ती जमिनीत खोलवर लावली गेली पाहिजेत, असे मत शेख यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना व्यक्त केले.