शहरातील फक्त भटक्या कुत्र्यांवर बेळगाव महापालिकेने गेल्या तीन वर्षात जवळपास 47.5 लाख रुपयांची रक्कम खर्च केली आहे. आरटीआय कार्यकर्ता भिमाप्पा गडाद यांना माहिती हक्क कायद्यांतर्गत ही माहिती उपलब्ध झाली आहे.
गडाद यांनी मिळविलेल्या आरटीआय माहितीनुसार गेल्या 3 वर्षात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पर्यायाने त्यांची वाढती संख्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी केलेल्या उपाय योजनांवर बेळगाव महापालिकेने 45 लाख 55 हजार 556 रुपये खर्च केले आहेत. 2014 -15 साली शहरातील 3,944 भटक्या कुत्र्यांवर 25 लाख 65 हजार 605 रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे
2017 -18 साली 972 भटक्या कुत्र्यांसाठी 6 लाख 97 हजार रुपये खर्च केले गेले आहेत, तर 2019 -20 साली मनपा व्याप्तीतील 1,598 भटक्या कुत्र्यांसाठी 14 लाख 95 हजार 531 रुपये खर्ची घालण्यात आले आहेत.
भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना निर्जनस्थळी नेऊन सोडण्यासाठी आलेला वाहतुकीचा खर्च लाखाच्या घरात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात फक्त भटक्या कुत्र्यांवर खर्च करण्यात आलेल्या पैशाबद्दल भिमाप्पा गडाद यांनी साशंकता व्यक्त केली असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.