आज शुक्रवार ते रविवार तीन दिवस कडकडीत बंद असून पोलीस प्रशासनाकडून काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, शुक्रवार 4 जून पासून तीन दिवसांचा विकेंड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
सकाळी सहा वाजल्यापासून सुरु झालेला वीकेण्ड लॉकडाउन सोमवारी सकाळी सहा पर्यंत राहणार आहे. पोलिस खात्याकडून लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये असे ,आवाहन पोलिस खात्याकडून करण्यात येत आहे.
तीन दिवसांच्या वीकेंड लॉकडाउन काळामध्ये सकाळी सहा ते दहा पर्यंतची भाजीपाला खरेदी बंद असेल. दूध, औषध दुकाने, तातडीची वैद्यकीय सेवा, परवानगी मिळालेले नियोजित विवाह आणि आंतरजिल्हा व आंतरराज्य मालवाहतूक सेवांना लॉकडाउन कालावधीत परवानगी देण्यात आली आहे.
रेशन दुकान आणि कृषी सेवा केंद्र सकाळी सहा ते दहा पर्यंत खुली राहतील. बँक बंद राहतील तर एटीएम सेवा सुरू राहणार आहे .कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये वारंवार सूचना दिल्या जात आहेत.तरीदेखील,बरेचसे लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत.विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची वाहने जप्त केली जात आहेत.
दरम्यान राज्य सरकारने लॉक डाऊन 7 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता हा लॉक डाऊन 14 जून पर्यंत असणार आहे.गुरुवारी बेळगाव पोलिसांनी लॉक डाऊनचे उल्लंघन केल्या प्रकरणी 32 वाहने जप्त केली तर मास्क न परिधान करणाऱ्या 279 जणांकडून दंड वसूल केला या शिवाय व्यवसाय सुरू करणारे खडे बाजार मधील एका दुकानावर देखील कारवाई केली आहे.