आपल्या देशाला आयुर्वेदाचा प्राचीन इतिहास आहे. आयुर्वेदामध्ये वनस्पतींपासून रामबाण औषधे बनविले जातात. यापैकी कांही वनस्पती अत्यंत दुर्मिळ आहेत. ‘सर्पगंधा’ ही त्यापैकीच एक अतिशय दुर्मिळ वनस्पती असून जी वनस्पतीप्रेमी माजी नगरसेविका लालन प्रभू यांनी आपल्या टेरेस गार्डनमध्ये फुलविली आहे.
सर्पगंधा ही अतिशय दुर्मिळ वनस्पती असून आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माजी नगरसेविका लालन प्रभू यांनी रामदेव गल्ली येथील श्रीराम मंदिरसमोर असलेल्या आपल्या इमारतीवर टेरेस गार्डन फुलवली आहे. या गार्डनमध्ये आता सर्पगंधा वनस्पतीची भर पडली आहे. सर्पगंधाचे वनस्पतीशास्त्रातील नांव ‘रावोलफिया सर्पेंटीना’ असे असून आयुर्वेदामध्ये ती अतिशय मौल्यवान मानली जाते असे प्रभू यांनी सांगितले. ही वनस्पती विशेषता सर्पदंशावर अतिशय रामबाण मानली जाते. पूर्ण वाढ झालेल्या सर्पगंधा वनस्पतीच्या मुळांचा रस जर दर दोन तासांनी याप्रमाणे तीन-चार वेळा पिण्यासाठी दिल्यास शरीरात भिनलेल्या सापाच्या विषाचा प्रभाव नाहीसा होतो. सर्पदंश विषारी असेल तर प्रारंभी सर्पगंधाच्या रसाची चव जिभेला कळत नाही. मात्र विषाचा प्रभाव जस जसा कमी होत जातो तसा या रसाचा कडवटपणा जाणवू लागतो. आयुर्वेदामध्ये फक्त सर्पदंश नाही तर विंचवाच्या डंखासह इतर कोणत्याही विषारी दंशावर सर्पगंधाच्या मुळांचा रस अत्यंत जालीम उपाय मानला जातो असे सांगून उच्च रक्तदाबासह अन्य विकारांवर देखील सर्पगंधा रामबाण उपाय असल्याची माहिती लालन प्रभू यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना दिली.
माजी नगरसेविका लालन प्रभू गेल्या 37 वर्षापासून आपल्या टेरेस गार्डनमध्ये विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींची लागवड केली आहे. देशासह विदेशातून त्यांनी ही रोपे मागविली आहेत. त्यांच्याकडे असलेल्या औषधी वनस्पतीमध्ये ओवा, गवतीचहा, त्रिफळा, शतावरी, वेल पेट्रिया, पॅसिफ्लोरा, वॉटर लीली आदींचा समावेश आहे.
या टेरेस गार्डनमधील औषधी तसेच फुले, फळे आणि शोभिवंत झाडांची रोपे मागील 20 वर्षापासून टवटवीत आहेत. या टेरेस गार्डनची देखभाल लालम प्रभू स्वतः करत असून प्रत्येकाने आपल्या टेरेसवर रोपे लावावीत असा संदेश त्यांनी दिला आहे. याद्वारे आपल्याला आनंद आणि चांगली हवा मिळते. भाजीपाला, फुले व फळे मिळतात असे त्यांचे म्हणणे आहे.
आपल्या टेरेस गार्डनमध्ये सामान्य माणसाने कधी पाहिली नसलेल्या वनस्पतींच्या रोपांची त्यांनी संवर्धन केले आहे. त्यांच्याकडे सुमारे 700 हून अधिक जातीची झाडे एकाच ठिकाणी आहेत. गार्डनमधील झाडांना अगदी लहान मुलांप्रमाणे जपावे लागते. रोज पाणी शेणखत तसेच वाढलेल्या झाडांची वेळेवर छाटणी करणे गरजेचे असते, असे वनस्पती शास्त्रात पदवीधर असलेल्या लालन प्रभू यांनी सांगितले.