बेळगाव शहर परिसरात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शाहुनगर येथील जोशी कॉलनीतील महापालिकेच्या खुल्या जागेत तुंबून आजूबाजूच्या घरांमध्ये शिरलेल्या गढुळ पाण्याला आज सकाळी जेसीबीच्या सहाय्याने वाट मोकळी करून देण्यात आली. यामुळे परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे
शाहुनगर येथील जोशी कॉलनीतील महापालिकेच्या खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबले असून ते आजूबाजूच्या घरात शिरले आहे, अशी माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी ही बाब शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या कानावर घातली. तेंव्हा आमदार बेनके यांनी त्वरित महापालिका अभियंता हणमंत कडलगी यांना संबंधित जागेत साठलेला केरकचरा काढून पाण्याला वाट करून देण्यात याव्यात अशी सुचना केली.
जोशी कॉलनीतील येथील रहिवासी मि. इंडिया सुनील आपटेकर यांनी दिलेल्या माहिती नुसार महानगरपालिकेच्या संबंधी खुल्या जागेच्या ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबरच मुख्य गटारीतून येणारा केरकचरा साचून राहिला होता.
पाण्याचा निचरा होण्यास वाईट नसल्यामुळे तुंबलेले पाणी रस्त्यावरून वाहण्याबरोबरच आसपासच्या घरांमध्ये शिरले होते. अनेक लोकांनी या भागात अतिक्रमणे करत केरकचरा, प्लास्टिक बाटल्या व पिशव्या टाकल्यामुळे घाणीचे प्रमाण वाढले होते. ही घाण पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून येऊन संबंधित खुल्या जागेवर साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांना संपर्क साधण्यात आला. तेंव्हा त्यांनी आज शुक्रवारी सकाळी 7 वाजता सुनील आपटेकर व महापालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जेसीबी लावून संबंधित जागेतील पाण्याचा निचरा केला. या कार्यवाहीमुळे या भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.