हॉस्पिटलमध्ये निधन पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह बिलासाठी अडवून न ठेवता तो संबंधित नातेवाईकांकडे तात्काळ सुपूर्द करावा असा सरकारचा आदेश आहे. मात्र हा आदेश धाब्यावर बसवून हॉस्पिटलच्या थकित बिलापोटी मृतदेह सुमारे 6 तास अडवून ठेवल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आणि मृताच्या कुटुंबीयांना मृतदेह मिळवून दिला. ही संतापजनक घटना काल बुधवारी रात्री किल्ला तलावा जवळील एका हॉस्पिटलमध्ये घडली.
याबाबतची माहिती अशी की किल्ला तलाव जवळील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये काल बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास एका व्यक्तीचे उपचाराचा फायदा न होता निधन झाले. तेंव्हा त्याचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले असता हॉस्पिटल प्रशासनाने मृतदेह त्यांच्याकडे सुपूर्द करण्यास नकार दिला. आधी थकीत बिलाची रक्कम अदा करा, मगच मृतदेह तुमच्याकडे सुपूर्द केला जाईल असे त्या कुटुंबीयांना बजावण्यात आले.
अचानक एकाच वेळी थकीत बिलाची मोठी रक्कम अदा करणे शक्य नसल्यामुळे असहाय्य कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्ते वन टच फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्याशी संपर्क साधला. पीडित कुटुंबाने हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर याना घटनेची कल्पना देऊन तात्काळ इस्पितळाकडे बोलावले त्यानंतर सुरेंद्र यांनी त्या हॉस्पिटलकडे धाव घेतली.
या उभयतांनी चौकशी केली असता हॉस्पिटलच्या उपचाराच्या खर्चापैकी 2 लाख रुपये भरण्यात आले होते आणि सुमारे 1 लाख 80 हजार रुपये भरावयाचे बाकी होते. थकीत बिलाची रक्कम थोड्या मुदतीत भरण्याची मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची तयारी होती. तथापि तात्काळ पैसे वसूल करण्यासाठी मृतदेह अडवून ठेवण्यात आल्याचे सुरेंद्र अनगोळकर आणि विठ्ठल पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना जाब विचारून धारेवर धरले. तसेच हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहासंदर्भात सरकारने काढलेल्या आदेशाची डॉक्टरांना जाणीव करून दिली. शिवाय मृतदेह ताब्यात न दिल्यास पोलिसात तक्रार नोंदवू अशी तंबीही दिली.
सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यासमोर अखेर नमते घेऊन संबंधित हॉस्पिटलने दुपारी 3 वाजल्यापासून तब्बल 6 तास अडवून ठेवलेला मृतदेह रात्री 9 च्या सुमारास कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. मृतदेहाच्या हेळसांडीच्या या प्रकाराबद्दल बेळगाव लाइव्हशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर आणि विठ्ठल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून घडल्या प्रकाराची माहिती दिली.
सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती बेळगावातील जवळपास सर्व हॉस्पिटलमध्ये मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यास टाळाटाळ करण्याचा प्रकार सातत्याने घडत असल्याचे सांगून जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच सरकारने मृतदेहाचा संदर्भात जो आदेश काढला आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी करून घ्यावी, अशी मागणी केली.