गौंडवाड (ता. बेळगाव) येथील शेतकरी विनोद पवार यांच्या शेतातील पाण्यामध्ये तब्बल 6 किलो वजनाचा ढेकूळ जातीचा मासा सापडल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
गौंडवाड (ता. बेळगाव) येथील प्रगतशील शेतकरी विनोद पवार यांचे शेत मार्कंडेय नदीकाठाला लागून आहे. परवा मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे मार्कंडेय नदीची पाण्याची पातळी वाढली असून नदीचे पाणी आसपासच्या शेतांमध्ये शिरले आहेत.
आपल्या शेतामध्ये किती पाणी आले आहे हे पाहण्यासाठी आज सकाळी विनोद पवार शेताकडे गेले होते. त्यावेळी शेतातील गाद्यामध्ये साचलेल्या नदीच्या पाण्यात ढेकूळ जातीचे असंख्य मासे उड्या मारताना दिसत होते.
तेंव्हा पवार यांनी मासे पकडण्यास सुरुवात केली असता त्यांना सर्वसामान्य ढेकुळ माशांपेक्षा अनेक पटीने मोठा ढेकूळ आढळला.
पवार यांनी महत्प्रयासाने त्या माशाला पकडून घरी आणले व त्याचे वजन केले असता तो तब्बल 6 किलोचा भरला. हा मासा पाहण्यासाठी पवार यांच्या घरी बघ्यांची गर्दी झाली होती. तसेच आज दिवसभर गौंडवाड परिसरात विनोद पवार यांनी पकडलेला मासा चर्चेचा विषय झाला होता.