जन्मताच छातीत छिद्र असल्यामुळे तातडीने शस्त्रक्रियेची गरज असलेल्या एका बालकाचा जीव वाचवण्यासाठी शिवसेनेची रुग्णवाहिका देवदूत बनून आली आणि तिने 500 कि. मी.चे अंतर पार करत त्या बालकाला बेळगावहून मुंबईला सुखरूप नेऊन उपचार उपलब्ध करून दिले.
याबाबतची माहिती अशी की, कॅम्प येथील शारदा बाळासाहेब सदलगे या महिलेला 13 दिवसांपूर्वी केएलई हॉस्पिटलमध्ये प्रसूत झाली. प्रसूतीनंतर जन्मलेल्या बालकाच्या छातीत छिद्र असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले. त्यावरील शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी सदलगे कुटुंबीयांना बालकाला तात्काळ मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अंधेरी -मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्या बालकावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.
शस्त्रक्रिया करण्याचे ठरले तरी कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉक डाऊनमुळे त्या बालकाला बेळगावहून मुंबईला न्यावयाचे कसे? हा मोठा प्रश्न होता. तेंव्हा सदलगे कुटुंबीयांनी शिवसेनेच्या बेळगाव विभाग आरोग्य कक्षाचे प्रमुख दत्ता जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी दत्ता जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदत करण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेची सुसज्ज रुग्णवाहिका त्यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून दिली.
या रुग्णवाहिकेने काल तब्बल 500 कि. मी. विनाखंड प्रवास करून आजारी बालकाला अंधेरी -मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये सुखरूप नेऊन पोचविले. शिवसेनेच्या बेळगाव विभाग आरोग्य कक्षाचे प्रमुख दत्ता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिका चालक राजू तुडयेकर आणि इतर शिवसैनिकांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी बेळगाव शिवसेनेसाठी देऊ केलेली रुग्णवाहिका सध्याच्या कोरोना काळात रुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका पार पडत आहे.
आता तब्बल 500 कि. मी. विनामूल्य सेवा देऊन या रुग्णवाहिकेने एका बालकाचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे. शिवसेनेच्या या कार्याबद्दल सर्वत्र प्रशंसोद्गार काढले जात आहेत.