पुढील मुख्यमंत्री कोण हे नेत्यांचे समर्थक सांगत असतात त्यात चूक कांहीच नाही. त्यांना आपण निर्बंध घालू शकत नाही असे सांगत केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बाजूने बॅटिंग सुरू केली आहे.
राज्य काँग्रेसमध्ये सध्या मूल जन्माला येण्याआधीच टोपड शिवायला घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसचा पुढील मुख्यमंत्री कोण? यावर जाहीर शेरेबाजी सुरू झाली आहे. काँग्रेसचे आमदार जमीर अहमद आणि राघवेंद्र हेब्बाळ यांनी तर सिद्धरामय्या हेच पुढील मुख्यमंत्री असतील असे सांगत सिद्धरामय्या विरोधी गटाची झोप उडवली आहे. त्यामुळे कनकपुराच्या डि. के. शिवकुमार यांचा रागाने तिळपापड होत आहे. यासंदर्भात सतीश जारकीहोळी यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बेळगावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अजून निवडणूक व्हायची आहे. आमदार निवडून यायला हवेत. त्यानंतर हायकमांड निर्णय घेईल. अजून निवडणूक झालेले नाही. कधी होईल माहीत नाही. त्यामुळे आत्ताच त्याबद्दल बोलणे योग्य नाही. मात्र चाहत्यांनी आपल्या नेत्याबद्दल अभिमान व्यक्त करणे स्वाभाविक आहे. त्यात कांही चूक नाही आणि त्यावर निर्बंधही आणता येत नाही. वाद काय सगळ्याच पक्षात असतात असे सांगत आपल्याही पक्षात वाद असल्याची कबुली सतीश जारकीहोळी यांनी दिली.
आपले बंधू रमेश जारकीहोळी यांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात आपल्याला कांही माहित नाही असे सांगत सतीश जारकीहोळी यांनी जे जाऊन आलेत त्यांनाच माहित असे उत्तर दिले. रमेश जारकीहोळी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार का? या प्रश्नावर हा विषय आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी संबंधित आहे. आम्ही जिल्हा स्तरावरचे यावर कांही बोलू शकत नाही. पक्षाचे वरिष्ठ त्याबाबत निर्णय घेतील त्यांनी आमच्याकडे कसलाच सल्ला मागितला नाही.
त्यामुळे आम्ही त्यांना आमचा अभिप्राय सांगायचा प्रश्न येत नाही असे ते उत्तरले. एकंदर निवडणुकांना अद्याप 2 वर्षे शिल्लक असताना काँग्रेसच्या गोटात मात्र एवढ्यातच मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डींग लावणे सुरू झाले आहे. कदाचित निवडणुकीत बहुमत मिळाल्यास या मुद्द्यावरून मोठे रणकंदन माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.