कोरोनाचे डोस उपलब्ध न झाल्यामुळे काल रविवारी शहरातील लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी कोनवाळ गल्ली येथील लसीकरण केंद्राच्या ठिकाणी लसीच्या 70 डोसांसाठी तब्बल 400 जणांनी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता.
बेळगाव शहरातील सुमारे 150 लसीकरण केंद्रांमध्ये काल रविवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. काल रविवारी सकाळपासून ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन लस घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोवीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस उपलब्ध नसल्यामुळे डोस मिळणार नसल्याचे फलक प्रत्येक ठिकाणी लावण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर आज सोमवारी कोनवाळ गल्ली येथील कन्नड माध्यम शाळेच्या ठिकाणी असलेल्या लसीकरण केंद्रात मात्र लसीचे 70 डोस उपलब्ध झाले होते. परिणामी काल लसीकरण होऊ न शकलेल्या नागरिकांनी आज या ठिकाणी गर्दी केली होती.
सदर केंद्राच्या ठिकाणी सुमारे 400 स्त्री-पुरुष नागरिकांचा जनसमुदाय जमा झाला होता. केंद्रात फक्त 70 डोस आहेत याची माहिती उपलब्ध होऊन देखील सुज्ञपणा दाखवून लोक घरी गेले नाहीत. लसीकरण सुरू होताच केंद्रात एकच झुंबड उडाली. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा नियम पायदळी तुडवत नागरिकांनी केंद्रात एकच दाटीवाटी केल्याचे पहावयास मिळाले. यावेळी काहींनी फेस मास्क देखील व्यवस्थित घातले नव्हते, त्यांचे फेसमास्क घसरून हनवटीवर आले होते.
गेल्या कांही दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यात व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. खास करून जागतिक योगदिन म्हणजे 21 जून रोजी सव्वा लाख जणांना लस देण्यात आली. त्यानंतरही विविध शिबीरं आणि जाहीर कार्यक्रम आयोजित करून लस देण्यात आली परंतु आता लसीकरणाचे डोस संपल्यामुळे लसीकरण मोहीम पुढील दोन ते तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सध्या सिव्हील हॉस्पिटलसह तालुका आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डोस उपलब्ध नसल्यामुळे ‘व्हॅक्सिन औट ऑफ स्टॉक’चे फलक झळकत आहेत.