कोरोना प्रादुर्भावाचे संकट अद्याप टळलेले नाही हे प्रशासन कानीकपाळी ओरडून सांगत असताना शहरवासीय मात्र आपले तेच खरे करत असून बेळगाव फ्रूट मार्केटमध्ये आज सकाळी कोरोना नियमाला हरताळ फासून खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती.
राज्यभरात अनलॉक जारी करण्यात आला असला तरी कोरोनाचे संकट अद्याप कळलेले नाही. त्यामुळे त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूची अद्यापही जारी आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, सामाजिक अंतराचे भान राखावे, फेस मास्क घालावा, असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी शहरातील फ्रुट मार्केट येथे आवक झालेल्या फळांच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती.
या गर्दीतील कांहीजणांनी फेस मास्कच घातले नव्हते, तर बर्याच जणांचे फेस मास्क हनुवटीवर आले होते. सामाजिक अंतराचा नियम पायदळी तुडवून त्याचा पार फज्जा उडविण्यात आल्याचे याठिकाणी दिसून आले.
सदर प्रकार सातत्याने सुरु राहिल्यास कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याबरोबरच फ्रुट मार्केटमधील व्यापारी संघटनेने वेळीच शहाणे होऊन मार्केटमधील खरेदी -विक्रीप्रसंगी कोरोना नियमांचे पालन होईल याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.