सुळगा -येळ्ळूर क्रॉस येथील मराठी भाषेतील दिशादर्शक फलकाची अज्ञातांकडून नासधूस करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार काल रविवारी उघडकीस आल्यानंतर काढून टाकण्यात आलेला तो फलक आज सोमवारी सकाळी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या नेतृत्वाखाली पुर्ववत आहे त्या जागी बसविण्यात आला आहे.
बेळगाव आणि इतर भागातून राजहंस गड व खानापूरकडे जाणाऱ्या लोकांची नेहमीच येळ्ळूर -सुळगा मार्गे वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कोणता रस्ता कोठे गेला आहे याची माहिती मिळावी यासाठी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या पुढाकाराने देसूर येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित पोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी सुळगा -येळ्ळूर क्रॉस येथे मराठी भाषेतील दिशादर्शक नाम फलक बसविला होता. मात्र मराठी भाषेचा पोटशूळ उठलेल्या कांही समाजकंटकांनी शनिवारी रात्री या फलकाला रंग फासून नासधूस करण्याद्वारे तो उचकटून फेकून दिल्याचे काल रविवारी निदर्शनास आले होते. सदर प्रकाराबद्दल मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
तथापी, आज सोमवारी सकाळी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या नेतृत्वाखाली नासधूस करण्यात आलेला सदर दिशादर्शक फलक पुन्हा पूर्ववत आहे त्या जागी बसविण्यात आला. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य पंकज घाडी, सतीश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रणजीत पोटे, अजित देशपांडे, गिरीश गोरे, वैभव जोशी, विनोद पाटील, बाळू कळसेकर, बसवंत कदम, मनोहर शिंदे, अरुण कळसेकर, राजू जळगेकर आदी उपस्थित होते. यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी सुळगा -येळ्ळूर क्रॉस येथे दिशादर्शक फलक नसल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी या ठिकाणी आम्ही दिशादर्शक फलक लावला आहे. यापूर्वी सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना याठिकाणी अधिकृत दिशादर्शक फलक बसविण्याची विनंती आम्ही केली होती. त्यांनीदेखील फलक बसविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप त्याची पूर्तता झालेले नसल्यामुळे आज पुन्हा आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन सादर करून या ठिकाणी कायमस्वरूपी दिशादर्शक फलक बसविण्याची विनंती करणार आहोत, असे सांगितले.
गेल्या कांही महिन्यांपासून कन्नड संघटनांनी मराठी भाषिकांना विविध प्रकारे विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अलीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसह लाॅक डाऊन असल्यामुळे कन्नड संघटनांच्या उचापती बंद झाल्या होत्या.
मात्र आता सर्व व्यवहार सुरू होताच पुन्हा एकदा अशा प्रकारे मराठी फलकांना लक्ष्य केले जात असल्याने मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई करावी अन्यथा मराठी भाषिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही देण्यात आला आहे.