घाबरू नका..तुमच्या रुग्णाला कांहीही होणार नाही… एवढे एक वाक्य अनेकांना दिलासा देऊन जाते. रुग्णाला हा दिलासा तर ते देतातच परंतु हॉस्पिटलमध्ये जनसंपर्क प्रमुख म्हणून आपले कामही चोख बजावताना देवदेवतांच्या भग्न प्रतिमांचे विधिवत विसर्जन करणे, कुत्रे किंवा अन्य जनावरे वाहनांखाली येऊ नयेत म्हणून काळजी घेणे आणि मृत प्राणी पक्षांवर अंत्यसंस्कार करणे, अशी अनेक कामे करणारे एक आगळा सामाजिक कार्यकर्ते म्हणजे वीरेश हिरेमठ.
बेळगाव लाईव्हने वीरेश हिरेमठ यांचे कार्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. तेंव्हा ते म्हणाले की, गेली 20 -22 वर्षे मी समाजसेवा करत आहे. प्रसिद्धीच्या मागे न धावता माझे हे कार्य सुरू आहे. विशेष करून रस्त्यावर मृत्यू पावलेल्या भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास आजच्या धावपळीच्या युगात रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या कुत्र्या मांजरांकडे पाहण्यास कोणालाही सवड नसते. कामाची घाई असल्यामुळे वाहन चालक बेधडक मृत कुत्र्याच्या कलेवरावरून वाहने हाकतात. हा प्रकार अत्यंत गैर आहे. कुत्रा हा इमानी प्राणी आहे. तो मनुष्याची काळजी घेणारा, त्याच्या घराचे रक्षण करणारा मुका जीव आहे. शिवाय कुत्रे म्हणजे बऱ्याच हिंदू देवतांचे वाहन मानले जाते. परंतु दुर्दैवाने त्याची किंमत केली जात नसल्याचे लक्षात येताच कांही वर्षापासून मी रस्त्यावर बेवारस मरून पडलेल्या कुत्र्यांवर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. याकामी मला माझे सहकारी निंगय्या गुरुकट्टी, बाळू कणबरकर, संजू रोणद आदींचे सहकार्य लाभत असते. एखादा मृत प्राणी रस्त्यावर तसाच पडून राहिल्यास कलेवर कुजून दुर्गंधीसह वायू प्रदूषण होऊन रोगराई पसरू शकते. हे मृत कुत्र्यांना रस्त्यावरून हटवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे आणखीन एक महत्त्वाचे कारण आहे, असे हिरेमठ यांनी सांगितले.
कोरोना प्रादुर्भाव काळात अलीकडे औषध इंजेक्शन आदींपेक्षा लोकांची ऑक्सीजन सिलेंडर मिळवण्यासाठी जास्त धडपड सुरू असलेली पहावयास मिळाली. ऑक्सीजन सिलेंडरसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजले जात होते. हे कशासाठी तर आज ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. याचे कारण बेसुमार वृक्षतोड हे आहे. ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी झाडे लावणे आणि जगवणे ही काळाची गरज आहे. यासाठी मी दरवर्षी 500 ते 600 झाडे हमखास लावतो. विशेष करून मंदिर -देवस्थान परिसरात मी हे वृक्षारोपण करतो, जेणेकरून त्याचे संवर्धन होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक ठिकाणी घरातील देवदेवतांचे फोटो टाकण्याच्या प्रकाराबद्दल बोलताना वीरेश हिरेमठ म्हणाले की, आपण घरातील देवदेवतांच्या फोटोंची मोठ्या श्रद्धेने पूजा करतो. मात्र ते फोटो जुने झाले किंवा नव्या घरात जाताना बरेच जण जुन्या घरातील देवतांचे फोटो रस्त्याकडेला गटारी शेजारी, झाडाखाली अथवा नदी -नाल्याच्या काठावर ठेवून घेतात. ही कृती अत्यंत चुकीचे आहे. यामुळे मनुष्य शापाचा धनी होतो. यासाठी मी दर रविवारी माझ्या सहकार्यांसह असे देवदेवतांचे फोटो एकत्र जमा करतो. त्यानंतर फोटोच्या काचा काढून त्या कचरा विल्हेवाट डेपोला पाठवतो आणि देवदेवतांची चित्रे व फोटो फ्रेम सर्व एकत्र करून प. पू. श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या उपस्थितीत अग्निसंस्कार करून त्यांचे विसर्जन करतो.
सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव काळात खास करून सफाई कर्मचारी, रस्त्यावर मास्क न घालता फिरणारे लोक आणि गोरगरिबांसाठी मी फेसमास्क वाटप करण्याचे उपक्रम राबवले आहेत. विजया ऑर्थो हॉस्पिटलमध्ये पीआरओ म्हणून काम करताना येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातलगांचे मनोबल वाढवण्यावर माझा अधिक भर असतो. अपघातग्रस्त व्यक्तींकडे हॉस्पिटलमध्ये दाखल होताना बिल भरण्यासाठी पुरेसे पैसे नसतात. अशा रुग्णांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून मी डॉक्टरांना सांगून पैसे भरण्यासाठी मुदत मिळवून देतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब रुग्णांच्या कुटुंबीयांकडे आर्थिक टंचाई असते, अशांना मी बिलामध्ये थोडी सवलत मिळवून देतो. आमचे प्रमुख डॉ. रवी पाटील हे देखील गरीब गरजू लोकांना मदत करण्याच्या वृत्तीचे असल्यामुळे ते देखील गरीब रुग्णांना बिलामध्ये सवलत देत असतात, असेही वीरेश हिरेमठ यांनी स्पष्ट केले.