पावसाळ्याला सुरुवात झाली असल्यामुळे आता खवय्यांची पसंती मानली जाणारी नैसर्गिक आळंबी बाजारात येण्यास सुरुवात झाली असून तिचा भाव सध्या तेजीत आहे.
बाजारात हवाबंद डब्यात मशरूम अर्थात आळंबी उपलब्ध असली तरी दरवर्षी पावसाळा सुरुवात झाल्यानंतर कांही ठराविक दर्दी खवय्ये मंडळी आतुरतेने निसर्गिक आळंबीची वाट पाहत असतात.
ती मिळविण्यासाठी हवा तो दाम मोजतात. नरगुंदकर भावे चौकातील बाजारात आज गुरुवारी सकाळी हालगा बस्तवाड भागातून आळंबीचे आगमन झाले असून चार ते पाच आळंबींच्या एका वाट्याची 100 ते 200 रुपयाला विक्री केली जात होती.
त्याचप्रमाणे किलोचा दर 800 रुपये सांगितला जात असून घासाघीस केल्यास 600 रुपये प्रति किलो दराने आळंबीची विक्री केली जात आहे.
दरवर्षी पावसाळ्याला सुरूवात झाली की बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागासह चंदीगड भागातूनही बेळगाव शहरातील बाजारात आळंबीचे आगमन होत असते. हवाबंद डब्यातील प्रिझर्वड मशरूम (आळंबी) पेक्षा नैसर्गिक आळंबी अतिशय चविष्ट असते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात ठराविक कालावधी मध्येच ती उपलब्ध होत असल्यामुळे तिला वाढती मागणी असते.