एका माथेफिरूने काल मध्यरात्री रस्त्याशेजारी पार्क केलेली दुचाकी वाहने एकामागोमाग एक बेधडक रस्त्यावर पाडून त्यांचे नुकसान केल्याची घटना आज पहाटे कडोलकर गल्ली येथे उघडकीस आली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, आज पहाटे पेपर टाकण्यास जाणाऱ्या लोकांना कडोलकर गल्ली येथे जुन्या युनियन बँकनजीक रस्त्याशेजारी पार्क करण्यात आलेली वाहने कोणीतरी जाणून बुजून पाडल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी ही बाब गल्लीतील नागरिकांना सांगताच प्रथम मोकाट जनावरांनी हा प्रताप केला असावा असा नागरिकांचा समज झाला. मात्र काहीनी संशयावरून दुचाकी वाहने पाडविलेल्या ठिकाणी असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगमध्ये काल रात्री 02:09 च्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती रस्त्याशेजारी पार्क केलेली तीन दुचाकी वाहने जाणून बुजून धक्के देऊन खाली पाडत असल्याचे निदर्शनास आले.
सदर प्रकारामुळे कडोलकर गल्लीतील सागर हुंदरे, अरुण खन्नूकर व सागर कडोलकर यांच्या दुचाकींचे बरेच नुकसान झाले आहे. कडोलकर गल्लीप्रमाणे भातकांडे गल्ली व मेणसे गल्ली परिसरातील हिरा टॉकीज मागे असणाऱ्या बोळामध्ये देखील अशाच पद्धतीने पार्क केलेली वाहने रस्त्यावर पाडण्यात आल्याचे समजते.
सदर प्रकारामुळे दुचाकींचे नुकसान झाल्यामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत असून सध्या संबंधित परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.
माथेफिरूचा व्हीडिओ
https://www.instagram.com/p/CP8KuIjhy6H/?utm_medium=copy_link