बिम्स हॉस्पिटलशी संबंधीत विविध बाबींसंदर्भात बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी रविवारी प्रादेशिक आयुक्त व बीम्सचे प्रशासक आदित्य आमलान बिश्वास यांची भेट घेतली. यावेळी प्रादेशिक आयुक्तांनी तात्काळ कारवाई करताना बीम्स शवागारातून मृतदेह घेऊन जाण्यासाठी भरमसाठ भाडे आकारत असल्याबद्दल खाजगी रुग्णवाहिकांना त्या ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे.
हॉस्पिटलमधील स्वागत कक्ष कायम 24 तास (24×7) खुला राहील. या ठिकाणी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हॉस्पिटलमधील विविध ठिकाणी जाण्यास मार्गदर्शन केले जाईल.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कोरोनाग्रस्त रुग्णांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार केला जाईल. रुग्णांच्या सहाय्यकांना (अटेंडर्स) वॉर्डात प्रवेश दिला जाणार नाही, असे आमदार बेनके आणि प्रादेशिक आयुक्त यांच्या बैठकीत ठरले.
त्याचप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट जर आली तर त्यासंदर्भात घ्यावयाच्या खबरदारी बाबत उभयतांमध्ये चर्चा झाली.
याप्रसंगी प्रादेशिक आयुक्त आणि आमदार बेनके यांनी बीम्स हॉस्पिटलमधील पुढील सुधारणांसाठी संबंधित खात्यांशी चर्चा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याची सूचना बीम्सच्या प्रभारी संचालकांना दिली.