राज्यातील भू-गर्भात असणाऱ्या खनिज संपत्तीचे समग्र सर्वेक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा (टेंडर) मागविण्यात आले आहेत. या सर्वेक्षणामुळे राज्यात किती खनिज संपत्ती आहे याची संपूर्ण माहिती मिळणार आहे, असे खाण आणि भूगर्भ खात्याचे मंत्री मुरुगेश निराणी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहांमध्ये आज गुरुवारी झालेल्या खाण व भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंत्री मुरुगेश निराणी पुढे म्हणाले, राज्यातील भू-गर्भात किती खनिज संपत्ती आहे याची माहिती मिळाल्यास त्या संपत्तीचा व्यवस्थित वापर करण्याच्या दृष्टीने योजना आखणे शक्य होणार आहे.
सध्या आपण मागील सर्वेक्षणाच्या आधारे खनिज संपत्ती मिळवत आहोत असे सांगून तथापि आधुनिक सर्वेक्षणाद्वारे खनिज संपत्ती शोधून काढल्यास कर्नाटक राज्य खनिज संपत्तीच्या बाबतीत श्रीमंत राज्य म्हणून पुढे येईल, असा विश्वास मंत्री निराणी यांनी व्यक्त केला.
खाण व भूगर्भ खात्याचे उपसंचालक लोकेश यांनी 2020 -21 सालामध्ये खान ठेकेदारीद्वारे मिळणाऱ्या 122 कोटी रुपयांपैकी 114 कोटी रुपये जमा झाले असल्यामुळे यामध्ये 93.46 टक्के प्रगती साध्य झाल्याची माहिती दिली.
बैठकीस विधानपरिषदेचे सदस्य मुख्य प्रतोद महांतेश कवडीमठ, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, विधानपरिषद सदस्य डॉ. साबण्णा तळवार, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन, उपविभागीय अधिकारी रवींद्र कर्लींगनावर, बैलहोंगल उपविभागीय अधिकारी शशिधर बगली आदींसह खाण व भूगर्भ खात्याचे अधिकारी उपस्थित होते.