राज्यात आज सोमवार 21 जूनपासून अनलॉक जारी होताच कोरोना मार्गदर्शक सूची धाब्यावर बसवून अवघे बेळगावकर खरेदीसाठी रस्त्यावर उतरले होते. परिणामी आज बाजारपेठेत तोबा गर्दी होऊन नागरिकांना जीवघेण्या कोरोनाचा विसर पडल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले.
म्हैसूर जिल्हा वगळता राज्यभरात आज पासून लाॅक डाऊनचा निर्बंध मागे घेण्यात आला आहे. बेळगावकरांना अलीकडे पाच दिवसांचा लाॅक डाऊन आणि दोन दिवसाच्या कडक लॉक डाउनची सवय झाली होती, त्यामुळे सरकारने राज्यात अनलाॅक जारी करताच आज बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी उसळली होती. खरेदी वेळी नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचे पहावयास मिळाले. गर्दी करण्याबरोबरच अनेकांनी हनुवटीवर मास्क अडकवले होते. तर सर्वत्र सामाजिक अंतराच्या नियमाला हरताळ फासण्यात येत होता. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील रस्त्यांवर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती.
नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कांदा मार्केट, मारुती गल्ली, खडेबाजार, बापट गल्ली, काकती वेस, मेणसे गल्ली, खडेबाजार शहापूर, बसवेश्वर सर्कल खासबाग, बाजार गल्ली, चावडी गल्ली, वडगाव, दाणे गल्ली शहापूर आदी ठिकाणचे रस्ते खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी फुलून गेलेले पहावयास मिळाले. येथील गर्दी पाहता जिवघेणा कोरोना प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे, याचा विसर सर्वांनाच पडल्याचे दिसून येत होते. यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. तेंव्हा नागरिकांनी वेळीच शहाणे होऊन विनाकारण बाजारपेठेत गर्दी करणे टाळावे आणि कोरोना नियमांचे पालन करावे, असे मत जाणकारांतून व्यक्त होत आहे.
कोरोना प्रादुर्भाव पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. तथापि लाॅक डाऊनचा कालावधी समाप्त झाला की मुख्य बाजारपेठेसह शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये नागरिकांची तोबा गर्दी होण्याचा प्रकार आता नवा राहिलेला नाही. प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी वारंवार नागरिकांना कल्पना देऊनही कोणीच ऐकत नसल्याने आता प्रशासन सुध्दा वैतागले आहे. त्यामुळे गेल्या एक -दोन आठवड्यापासून ‘त्यांचे आरोग्य त्यांची जबाबदारी’ अशीच भूमिका प्रशासनाने घेतली आहे. दरम्यान, कोरोना टळलेला नाही. तेंव्हा नागरिकांनी घराबाहेर पडल्यानंतर मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे. फेसमास्क सक्तीने वापरावा. सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.