कोरे गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक आणि माजी नगरसेवक मोहन आप्पाजी चिगरे यांचे काल बुधवारी रात्री निधन झाल्यामुळे शहरातील एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
बेळगाव महापालिकेच्या राजकारणात नगरसेवक मोहन आप्पाजी चिगरे यांनी एकेकाळी आपली अशी वेगळी छाप पाडली होती. महापालिकेतील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी गटाचे अर्थात तत्कालीन विरोधी गटाचे नेतेपद भूषविताना त्यानी सत्ताधारी गटाला अनेकदा धारेवर धरून सभाग्रहात आपला दबदबा निर्माण केला होता. विजय मोरे यांची महापौर आणि प्रकाश शिरोळकर यांची उपमहापौर पदी निवड करण्यात मोहन चिगरे यांचा सिंहाचा वाटा होता.
टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वेगेट नजीकच्या श्री साई मंदिराचे विश्वस्त असणाऱ्या मोहन चिगरे यांनी या मंदिरासमोरील महापालिकेच्या जागेत श्री मारुती मंदिराची उभारणी केली. तसेच या ठिकाणी दररोज दुपारी महाप्रसाद वाटपास सुरुवात केली.
भाविकांसह गरीब गरजूंना प्रसादाच्या स्वरूपात पोटाला अन्न मिळावे हा या मागचा उदात्त हेतू होता. सदर मंदिराच्या ठिकाणी गेल्या सुमारे 12 वर्षापासून सलग दुपारी महाप्रसादाच्या स्वरूपात हे अन्नछत्र चालविले जात आहे. त्याचप्रमाणे हभप शंकर बाबली, प्रभाकर काकडे आणि प्रभाकर सांबरेकर यांच्या सहकार्याने चिगरे या मारुती मंदिराच्या ठिकाणी गेली अनेक वर्ष श्री ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करत होते.
महाराष्ट्रातील शिर्डी नजीकच्या कोपरगाव येथील जंगली महाराज आश्रमाचे विद्यमान जंगलीदास महाराज यांचे मोहन चिगरे हे अनुयायी होते. बेळगाव वारकरी भाविक संघाचे उपाध्यक्ष असणाऱ्या मोहन चिगरे यांचे 2006 -07 साली श्री बाबामहाराज सातारकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे बेळगावात आयोजन करण्यात महत्त्वाचे योगदान होते. सामाजिक कार्याबरोबरच गल्लीतील शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या आयोजनात ते नेहमी आघाडीवर असत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही उत्सव कोरे गल्लीत उत्साहाने साजरे केले जात. मोहन आप्पाजी चिगरे यांच्या निधनामुळे बेळगावच्या सामाजिक क्षेत्रातील एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.