आमदार पदाचा देखील राजीनामा देण्याचे माझा मनात असले तरी आत्ताच मी तो देणार नाही. आणखी दोन -तीन दिवस विचार करून मी माझा अंतिम निर्णय जाहीर करेन, अशी माहिती माजी जलसंपदा मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव विमानतळावरून आज सकाळी खास विमानाने म्हैसूरला जाऊन पुन्हा बेळगावला परतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जारकीहोळी यांनी उपरोक्त माहिती दिली. आपल्या म्हैसूर दौर्याबद्दल सांगताना तेथील सुत्तुर मठाधिशांच्या आईचे निधन झाल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी आपण म्हैसूरला गेलो होतो. या मागे कोणताही राजकीय हेतू नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता तुम्ही आमदार पदाचा देखील राजीनामा देणार असे बोलले जात आहे. तुम्ही राजकारणाला एवढे कंटाळा आहात काय? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आमदार पदाचा राजीनामा देण्याचे माझ्या मनात होते. निकटवर्तीयांकडे त्याबद्दल मी बोललोही होतो. मात्र ही बातमी प्रसिद्धी माध्यमांपर्यंत कशी पोहोचली माहित नाही. तथापि मी आत्ताच राजीनामा देणार नाही आणखी दोन-तीन दिवस विचार करून मी माझा निर्णय जाहीर करेन.
राज्यातील कांही भाजप नेतेच माझ्या वाईटावर उठले आहेत हे खरे असले तरी आमचा पक्ष संघ परिवार आणि दिल्लीतील हायकमांडकडून मला अत्यंत प्रेमाची वागणूक मिळत आहे, यात कांही दुमत नाही. जे नेते माझ्या वाईटावर उठले आहेत त्यांच्याबद्दल आत्ता नाही नंतर मी सर्वकांही सांगेन, असेही रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. ‘मंत्रीपद मिळवण्यासाठी रमेश जारकीहोळी लॉबी करत आहेत’ असा अपप्रचार केला जात आहे. लॉबी करून मंत्रिपद मिळवण्या इतका मी क्षुल्लक माणूस नाही. सरकार स्थापण्या इतकी ताकद माझ्यात आहे. तेंव्हा मला मंत्रिपद मिळवून द्या अशी विनवणी करत कोणाच्या घरापर्यंत जाण्याची मला गरज नाही. मी तितका लहान माणूस नाही, असेही ते म्हणाले.
मागे पीएलडी बँकेच्या निवडणूकी वेळी पुणे येथे मी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना मी जे कांही सांगितले ते आज घडत आहे. मी नाटक करणारा किंवा प्रसारमाध्यमांना हाताशी धरून राजकीय फायदा घेणारा माणूस नाही, असे जारकीहोळी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बदला बाबत बोलताना माननीय बी. एस. येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री राहतील आणि ते आपला दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील. पुढे हायकमांड काय निर्णय घेते ते बघूया, असेही आमदार रमेश जारकीहोळी यांनी शेवटी स्पष्ट केले.