1 जून 1986 च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीसह शिवसेना व अन्य संघटनांच्यावतीने आज मंगळवारी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी आज मंगळवारी सकाळी या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नी सर्वांनी कटिबद्ध व्हा असे आवाहन यावेळी सीमावासियांना करण्यात आले.
कोरोनाते संकट असल्याने सामाजिक अंतराचा नियम पाळून हा हुतात्मा दिन कार्यक्रम झाला. सीमाप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने शिक्षणात कन्नड सक्ती केल्याच्या विरोधात 1 जून 1986 रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात कन्नड सक्ती विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात 9 जण शहिद झाले होते. त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याची स्मरण म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे दरवर्षी 1 जून रोजी सीमाभागात हुतात्मा दिन पाळण्यात येतो. त्याचप्रमाणे हुतात्मा अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी आज सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील आदींनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार -पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, कन्नड सक्ती विरोधात 1 जून 1986 रोजी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात अभूतपूर्व आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 9 जण हुतात्मे झाले. आजही कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय केला जात आहे. सध्या सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. तेथे आम्हाला न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते एल. आय. पाटील, प्रकाश मरगाळे, किरण गावडे, नेताजी जाधव, मदन बामणे, ॲड. सुधीर चव्हाण, रामचंद्र कुद्रेमनीकर आदी समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर बेळगाव लाइव्हशी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी कोरोनाच्या नियमाचे पालन करून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीसह बेळगाव तालुका म. ए. समिती, खानापूर म. ए. समिती आणि इतर संबंधितांनी आज कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण केली आहे.
या हुतात्म्यांनी पुढील पिढीच्या भवितव्यासाठी स्वतःचा विचार न करता आपले रक्त सांडले. त्यांचा गौरव झालाच पाहिजे. त्यांच्या बलिदानाची आम्हाला सदोदीत जाणीव राहील असे सांगून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी समितीच्या सर्व घटकांनी आजपर्यंत जसे एकजुटीने काम केले तसेच काम यापुढे करूया आणि हुतात्म्यांचे स्वप्न साकार करूया असे सांगितले.