राज्याच्या आरोग्य खात्यात लवकरच मेगा भरती करण्यात येणार असून त्यामध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण युवक-युवतींना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्याचे मंत्री सुधाकर यांनी नुकतीच दिली आहे. परिणामी अनेकांसाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर ठिकाणी असलेली कर्मचाऱ्यांची कमतरता प्रकर्षाने दिसून आली.
मनुष्यबळ टंचाईमुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे सरकारने लवकरच राज्यात 20 हजार जागा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीत दहावी व बारावी उत्तीर्णांना प्राधान्य देऊन त्यांना वैद्यकीय उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा वापर आणि इतर प्राथमिक आरोग्य विषयक माहिती देऊन त्यांना सेवेत भरती करून घेतले जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री सुधाकर यांनी दिली.
याखेरीज प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 100 बेड्सचे एक हॉस्पिटल उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात दहावी आणि बारावी उत्तीर्णांची संख्या अधिक आहे मात्र नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने हजारो युवक बेरोजगार आहेत. आरोग्य खात्याच्या या मेगा भरतीमुळे आता या हजारो युवकांना त्याचा लाभ होणार आहे.