Saturday, December 21, 2024

/

लॉक डाऊन वाढीबद्दल चर्चेअंती निर्णय : मुख्यमंत्री

 belgaum

बेळगावसह 8 जिल्ह्यातील लाॅक डाऊनचा कालावधी वाढविण्यासंदर्भात मंत्री, अधिकारी आणि तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी आज दिली.

कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासंदर्भात बेळगावसह 8 जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाशी आज गुरुवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. राज्यातील आठ जिल्ह्यामध्ये लाॅक डाऊनचा कालावधी आणखी वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. लाॅक डाऊनचा कालावधी वाढवायचा ती नाही आणि वाढविला तर कोणकोणत्या गोष्टींना त्यामध्ये सवलत द्यावी यासंदर्भात सर्वांगाने सखोल चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कांही तालुक्यात लाॅक डाऊन वाढविला आणि कांही तालुक्यात अनलॉकिंग केले तर निर्माण होणारी परिस्थिती कशी हाताळावी. तसेच यामुळे संसर्ग कमी होईल का? याबाबत विचारविमर्श केला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सध्याच्या लाॅक डाऊनमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी बेळगावसह अन्य 8 जिल्ह्यातील संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी कोरोना मार्गदर्शक सूचीचे कडक पालन केले जावे अशी सूचनाही त्यांनी केली. सदर जिल्ह्यातील संसर्ग रोखण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी तपासणी अहवाल शीघ्र उपलब्ध होण्यासाठी क्रम घेतले जावेत. पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्‍क्‍यांपर्यंत कमी होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.Meeting lock down extend

बेळगाव हा गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील जिल्हा असल्यामुळे तसेच येथील पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्क्याच्या आसपास असल्याने कांही ठराविक गोष्टींना मुभा देऊन येथील लाॅक डाऊन आणखी आठवडाभर वाढवावा अशी विनंती यावेळी उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मुख्यमंत्र्यांना केली. ऑटोमोबाईल, बांधकाम यासारख्या प्रमुख क्षेत्रांना सूट देऊन लाॅक डाऊन एका आठवड्यासाठी वाढवावा असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 135 वैद्यकीय पथकानेद्वारे 1300 खेडेगावांमध्ये रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली असून याखेरीज इतर उपाय योजनांद्वारे पॉझिटिव्हिटी रेट 8.9 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाला असल्याचे कारजोळ यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगप्रसंगी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिश्वास, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जि. पं. सीईओ डॉ. दर्शन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, बीम्सचे संचालक डॉ. कुलकर्णी, मनपा आयुक्त जगदीश के. एच., उपविभागाधिकारी रवींद्र कर्लींगनावर, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार आदींसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.