बेळगावातील सर्वाधिक दबदबा असणारे पोलीस ठाणे म्हणजे मार्केट पोलीस ठाणे होय. सदर पोलीस ठाण्याने फेब्रुवारीमध्ये 50 वर्षे पूर्ण केली आहेत. या सुवर्ण महोत्सवानिमित्त मार्केट पोलीस ठाण्याचे सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी आपल्या ठाण्याला आकर्षक स्वरूपासह एक नवा लुक दिला आहे.
सुवर्ण महोत्सवानिमित्त मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील दानशूर मंडळींच्या सहकार्याने पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलताना ठाण्याला हायटेक स्वरूप देण्यात सीपीआय शिवयोगी यशस्वी झाले आहेत. सीपीआय चेंबर आणि पीएसआय चेंबरसह पोलिस ठाण्यातील सर्व विभाग, सर्व कोठड्यांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच ठाण्याच्या बाह्य स्वरूपाला रंगरंगोटी करून त्यांनी नवा लुक दिला आहे.
पोलीस ठाण्यात येणार्यांना बसण्यासाठी बाहेरील बाजूस आसन व्यवस्था करण्यात आली आहे. याखेरीज नवे इलेक्ट्रिक स्विच बोर्ड बसवण्यासह सर्व विभागातील फर्निचर बदलण्यात आले आहे.
आत्तापर्यंत मार्केट पोलीस ठाण्यात सीपीआय म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्यांनी फक्त आपल्या चेंबरच्या सुधारणेवरच भर दिला होता. मात्र सीपीआय संगमेश शिवयोगी याला अपवाद ठरले असून त्यांनी जातीने लक्ष घालून संपूर्ण पोलिस ठाणे आकर्षक करण्याद्वारे एक आदर्श निर्माण केला आहे.
सीपीआय संगमेश शिवयोगी यांची मार्केट पोलिस ठाण्यातून नुकतीच निपाणीला बदली झाली असली तरी त्यांनी केलेले उपरोक्त कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे.